Breaking News

संजय राऊत यांच्यावरील धाडीवरून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले,चौकशी होऊ द्या… त्यातून जे पुढे येईल ते तुम्हाला कळेलच

पत्रावाला चाळ प्रकरणी तीन वेळा समन्स बजावूनही चौकशीला हजर राहिले नाहीत म्हणून आज सकाळी ईडीने संजय राऊत यांच्या मैत्री या बंगल्यावर धाड टाकत त्यांची चौकशी सुरु केली. जवळपास साडे नऊ तास त्यांची चौकशी करण्यात आली. या चौकशीची भाजपासह शिंदे गटाने स्वागत केले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत विचारण्यात आले असता ते म्हणाले की, ते म्हणाले होते चौकशीला सामोरे जाणार म्हणून. चौकशी होऊन जाऊ द्या. जे काही होईल ते तुम्हाला कळेलच असे म्हणाले

राऊतांना अटक होतेय की नाही हे मला माहिती नाही. मी ईडीचा अधिकारी नाही असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

एकनाथ शिंदे म्हणाले, संजय राऊतांची चौकशी सुरू आहे. ही चौकशी होऊ द्या. त्यांना अटक होतेय की नाही हे मला माहिती नाही. मी ईडीचा अधिकारी नाही. ते तर म्हणाले होते मी काहीच केलेलं नाही. त्यामुळे ‘कर नाही त्याला डर कशाला’ असायला हवी. ते ईडीच्या चौकशीला सामोरं जाणार बोलत होते. आज चौकशी होऊ द्या. त्यातून जे पुढे येईल ते तुम्हाला कळेलच. ते महाविकास आघाडीचे मोठे नेते होते. दरदिवशी ९ वाजता तुम्ही त्यांची बाईट घेत होते.

केंद्रीय तपास संस्थांनी यापूर्वी देखील काही कारवाई केल्या आहेत. त्यांनी सुडाने काम केलं असतं, चुकीच्या पद्धतीने कारवाई केली असती तर न्यायालयाने त्यांना लगेच दिलासा दिला असता. यापूर्वीच्या देखील कारवाया तपासून घ्या. आम्ही एवढं मोठं सरकार बनवलं त्यात एक तरी सुडाची कारवाई केली का? आमच्यापैकी एका आमदाराने तरी सांगितलं का की ईडीने नोटीस पाठवली म्हणून आम्ही तिकडे गेलो. असं कुणी म्हणालं का? असा सवालही त्यांनी यावेळी केला.

राऊत यांच्यावर नेमका काय आक्षेप:-

पत्रा चाळ परिसराचे मूळ क्षेत्रफळ (१,९३,५९९ चौरस मीटर) विकास करारनाम्यात १,६५,८०५ चौरस मीटर म्हणजे २७,७९४ चौरस मीटर कमी दाखविण्यात आले. म्हाडाच्या वाटय़ाला येणाऱ्या ५० टक्के म्हणजे १३,८९७ चौरस मीटर (तीन एकर) जागेचा विकासकाला फायदा करून दिल्याप्रकरणी कार्यकारी अभियंता एस. डी. महाजन निलंबित.

मे. गुरू-आशीष कन्स्ट्रक्शनने ‘युनियन बँक ऑफ इंडिया’कडून कर्ज घेतले होते. या कर्जाची परतफेड न झाल्याने बँकेने विकासकाविरुद्ध लवादाकडे दिवाळखोरी प्रक्रिया सुरू करण्याबाबत अर्ज केला. त्यानुसार ‘राष्ट्रीय कंपनी विधी लवादा’ने विकासकाला म्हणजेच या कंपनीला दिवाळखोर घोषित केलं.

मे. गुरू-आशीष कन्स्ट्रक्शन्स’च्या नावाखाली हा सर्व घोटाळा झाला तेव्हा राजेश कुमार वाधवान, सारंग वाधवा आणि प्रवीण राऊत हे या कंपनीचे संचालक होते. ही कंपनी आणि म्हाडा दरम्यान झालेल्या करारामनुसार येथील ६७२ कुटुंबांना पुन:विकसित केलेले प्लॅट्स म्हाडाच्या माध्यमातून बांधून देणं अपेक्षित होतं. त्यानंतर उर्वरित जमीन ही विकासांना विकली जाणार होती. ‘मे. गुरू-आशीष कन्स्ट्रक्शन्स’च्या संचालकांनी म्हाडाची फसवणूक केली. त्यांनी या जागेचा एफएसआय ९ विकासकांना विकला. यामधून त्यांनी अंदाज ९०१ कोटी ७९ लाखांचा निधी मिळवला. मात्र त्यांनी म्हाडासाठी ६७२ घरांचा बांधकाम केलं नाही.

तसेच ‘मे. गुरू-आशीष कन्स्ट्रक्शन्स’ या कंपनीने मेडोज नावाने एका प्रकल्पाची घोषणा करुन फ्लॅट घेणाऱ्यांकडून १३८ कोटींची रक्कम जमा केली. या बेकायदेशीर माध्यमातून ‘मे. गुरू-आशीष कन्स्ट्रक्शन्स’च्या संचालकांनी जमा केलेली एकूण रक्कम ही एक हजार ३९ कोटी ७९ लाख इतकी आहे. यापैकी काही संपत्ती ही जवळच्या व्यक्तींच्या नावे वळवण्यात आली, असं ईडीने जारी केलेल्या पत्रकात म्हटलंय.

Check Also

नाना पटोले यांची टीका,… हा तर छत्रपती शिवरायांचा अपमान

हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षाकडून सातत्याने केला जात आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *