Breaking News

उमेदवारी अर्ज भरल्यानंतर बावनकुळे आणि परब यांच्याकडून परस्पर पूरक दावे दोघांनीही केला आपलाच उमेदवार विजयी होण्याचा दावा

अंधेरी विधानसभा पोट निवडणूकासाठी ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून ऋतुजा लटके आणि संदीप नाईक या दोघांनी अर्ज भरले. तर भाजपा-शिंदे गटाकडून मुरजी पटेल यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या दोन्ही उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी आपलाच उमेदवार विजयी होणार असल्याचा दावा केला.

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे मशाल हे चिन्ह सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या हातात आहे आणि त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ आहे.त्यांनी काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसचे विचार स्वीकारले आहेत.त्यामुळे उद्धव सेनेला मत म्हणजे काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसला मत देणे आहे.अशा स्थितीत युतीचा पारंपरिक मतदार ठाकरे यांच्या शिवसेनेला मतदान करणार नाही.या निवडणुकीत भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना युतीचे उमेदवार मुरजी पटेल निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या निवडणुकीत शिंदे गट निवडणुक लढवित नाही. तर शिवसेनेकडून (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या समोर भाजपाकडून मुरजी पटेल लढत देणार आहेत. त्यामुळे आता ही लढाई भाजपा विरुद्ध ठाकरे गट अशी आमनेसामने होणार आहे. दरम्यान आज उद्धव ठाकरे गटाने सध्याची राजकीय परिस्थिती पाहता सावधता बाळगत आणखी एक उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ऋतुजा लटके यांच्या सोबतच आता संदीप नाईक यांनीही ठाकरे गटाकडून उमेदवारी अर्ज भरला आहे.

शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या निर्णयामागे काय कारण आहे, याबाबत अनिल परब म्हणाले, “हा नियमचं असतो. शिवसेनेचा अधिकृत उमेदवार ऋतुजा रमेश लटके यांनी अर्ज दाखल केला आहे. परंतु आपल्या आयोगाचे नियम आहेत. ज्यामध्ये शिवसेना ए आणि बी फॉर्म भरते, त्यामध्ये ही तरतूद असते. पहिला उमेदवार अधिकृत ठरला असताना त्याने समजा काही कारणास्तव अर्ज मागे घेतला किंवा त्यांचा फॉर्म जर बाद झाला. तर शिवसेनेचा दुसरा अधिकृत उमेदवार म्हणून ज्याचं नाव त्या फॉर्मध्ये लिहिलेलं असतं. त्याला अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर केलं जातं. म्हणून शिवसेनेने संदीप नाईक यांचा उमेदवारी अर्ज सादर केला आहे. त्याला डमी उमेदवार असंही म्हटलं जातं. मात्र ज्यावेळी ऋतुजा नाईक यांचा अर्ज छाननीत मान्य होईल, तेव्हा ती उमेदवारी मागे घेतली आते.

या निवडणूकीत आम्हाला लढायचं आहे. यामध्ये आणि १०० टक्के महाविकास आघाडीच्या उमेदवार, ऋतुजा रमेश लटके या विक्रमी मतांनी विजयी होतील. यात कुठलीही शंका नाही असे परब यावेळी म्हणाले.

संदीप नाईक दिवंगत आमदार रमेश लटके यांचे निकवर्तीय आणि युवा सेनेचे पदाधिकारी आहेत. शिवाय ते या भागातील शिवसेनेचे माजी नगरसेवक आहेत. लटके यांच्यासोबत सक्रीय असल्यामुळे त्यांचा या मतदारसंघाचा चांगला अभ्यास आहे. याशिवाय रमेश लटके कुटुंबीयांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. ऋतुजा लटकेंचा राजीनामा प्रकरणी पेच निर्माण झाला तेव्हा ठाकरे गटाकडून संदीप नाईक यांचा विचार केला जात होता.

Check Also

नाना पटोले यांची टीका,… हा तर छत्रपती शिवरायांचा अपमान

हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षाकडून सातत्याने केला जात आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *