Breaking News

बलात्कारी लोकांना पाठीशी घालणारे फडणवीस सरकार हाय हाय घटनेची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची खा. सुप्रिया सुळेंची मागणी

मुंबईः प्रतिनिधी
राज्यात अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार आणि जालना जिल्हयातील १९ वर्षीय मुलीवर मुंबईतील चेंबुर परिसरात चार नराधमांनी विषारी ड्रग्ज पाजवून सामुहिक बलात्कार केला होता. त्यात एक महिना मृत्यूशी झुंज दिल्यानंतर त्या मुलीचा जगण्याशी संघर्ष गुरुवारी संपला. याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून मुंबईमध्ये सरकारविरोधात भव्य मोर्चा काढण्यात आला.
यावेळी होश मे आओ होशमे आओ फडणवीस सरकार होशमे आओ… महिलाओंके सम्मानमे राष्ट्रवादी मैदानमे… बलात्कारी लोकांना पाठीशी घालणाऱ्या भाजप सरकारचा धिक्कार असो…फाशी द्या फाशी द्या बलात्कार करणाऱ्या नराधमाला फाशी द्या…फडणवीस सरकार हाय हाय… अशा गगनभेदी घोषणा देत राष्ट्रवादी मुंबई काँग्रेसने मुंबई दणाणून सोडली.
चेंबूर लाल डोंगर ते चुनाभट्टी पोलिस ठाणे असा हा भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारो महिला, पुरुष पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. मुंबईमध्ये राष्ट्रवादीने काढलेल्या सरकार विरोधातील मोर्चामध्ये मुंबईकर सर्वसामान्य जनताही सहभागी झालेली पाहावयास मिळाली.
चुनाभट्टी पोलिस ठाण्यावर भव्य मोर्चा आल्यावर पोलिसांनी तो अडवला. त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे, मुंबई अध्यक्ष व राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, आमदार विदया चव्हाण यांच्या शिष्टमंडळाने पोलिसांची भेट घेऊन त्या नराधमांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. तसं नाही झालं तर यापेक्षा मोठया पध्दतीचा व तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला.
या घटनेची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी करतानाच जोपर्यंत त्या पिडीत कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी पोलिसांशी चर्चा करुन आल्यावर माध्यमांशी बोलताना दिला आहे.
दरम्यान पिडीत मुलीच्या भावाला घेवून पोलिस महासंचालकांची भेट घेणार असल्याचेही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी यावेळी सांगितले. या मोर्चाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे, मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी केले. यावेळी खासदार सुप्रियाताई सुळे, मुंबई अध्यक्ष नवाब मलिक, मुंबई महिला अध्यक्षा सुरेखा पेडणेकर, आमदार विदया चव्हाण, मुंबई महानगरपालिकेतील गटनेत्या राखी जाधव, युवती अध्यक्षा अदिती नलावडे, मुंबई युवक अध्यक्ष निलेश भोसले आदींसह मुंबईतील सर्व विभागातील हजारो महिला आणि पदाधिकारी यामध्ये सहभागी झाले होते.

Check Also

राज ठाकरे यांच्या महाराष्ट्रासाठी मागितल्या या गोष्टी, पण पंतप्रधान मोदींकडून साधा उल्लेखही नाही

स्वातंत्र्य मिळाल्यावर काँग्रेस विसर्जित करावी असा सल्ला महात्मा गांधींनी दिला होता. त्यानुसार काँग्रेस विसर्जित झाली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *