Breaking News

नारायण राणे यांचा आरोप, उध्दव ठाकरेंनी छोटा शकील आणि राजनला सुपारी दिली शिवसेना सोडल्यानंतर आपल्याला मारण्याची सुपारी दिल्याचा केला आरोप

शिवसेना सोडल्यानंतर मला ठार मारण्यासाठी उध्दव ठाकरे यांनी छोटा शकील आणि छोटा राजन यांना सुपारी दिली होती असा खळबळजनक आरोप भाजपाचे नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर केला.

तसेच मनोहर जोशी यांच्या घरावर हल्ला करण्यास सदा सरवणकर यांना उध्दव ठाकरे यांनी सांगितले होते असा आरोपही त्यांनी केला.

भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री नारायण राणे बोलत होते.

लोकांचे शोषण करून मिळालेला पैसा ठाकरे यांनी व्हाईट केला असून, त्याचे पुरावे मी दिल्लीत योग्य ठिकाणी दिले आहेत असे सांगत ठाकरे यांची सुटका नाही, ठाकरे यांना अडीच वर्षे आत जावे लागणार, असा इशाराही राणे यांनी उद्धव ठाकरे यांना दिला. शिवतीर्थावरचा मेळावा हा तमाशावाल्यांचा होता, असा टोला लगावत ठाकरे हे लबाड लांगडे असल्याचा घणाघातही त्यांनी केला.

दसरा मेळाव्यावरून राजकारण तापले असून, शिवसेनेच्या मेळाळ्यात ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. त्यावर पत्रकार परिषद घेऊन राणे यांनी ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.

यावेळी राणे म्हणाले, एकेकाळी दसरा मेळाव्यात दत्ताजी साळवी, प्रमोद नवलकर, वामनराव महाडिक असे नेते वक्ते असायचे. आताच्या वक्त्यांचं नाव घेणार नाही. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या वक्त्यांचा दर्जा घसरला आहे. बौद्घिकता काय होती या वक्त्यांची? त्यांचा विधायक कामाचा काय अनुभव होता? केवळ राणेंवर टीका करण्यासाठी ही लोकं आणली होती, असेही ते म्हणाले.

यावेळी राणेंनी आदित्य, तेजस आणि रश्मी ठाकरे यांच्यासह उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावरही जोरदार निशाणा साधला. राणे म्हणाले, कोरोनात उद्योग-धंदे बंद असताना, शिवसेनेच्या मुखपत्रातून उत्पन्न दाखविले आहे. ठाकरे यांचा काळा पैसा पांढरा करण्यात आला आहे. इतरांवर खोक्यांचा आरोप करणाऱ्या ठाकरे यांच्याकडील खोक्यांचे उत्पन्न दाखविले गेले. २ वर्षात कोरोनामुळे धंदे बंद झाले. बेकारी आली एवढी भयावह परिस्थिती असताना सर्व कंपन्या लॉसमध्ये होत्या. अशावेळी सामनाने २ वर्षात ४२ कोटी धंदा केला आणि ११ कोटी प्रॉफिट मध्ये होता. सर्व प्रिंट, इलेक्ट्रॉनिक मीडिया लॉसमध्ये गेले मात्र सामना प्रॉफिटमध्ये होता. याबाबतचे सर्व पुरावे दिल्लीत योग्य ठिकाणी दिले आहेत. आमच्या घरापर्यंत येणाऱ्यांना मी स्वस्थ बसू देणार नाही असा इशारा देत दिशा सलियानची तुम्ही मुख्यमंत्री असताना हत्या झाली. बाहेर लोक चर्चा करतात की आदित्य ठाकरे त्या केसमध्ये आहेत. मी नाव घेत नव्हतो मात्र आता बाहेर चर्चा सुरू झाली आहे. वाझेच्या माध्यमातून ही केस दाबण्यात आली, असा थेट आरोपही त्यांनी यावेळी केला.

“बाळासाहेबांचे भाऊ, मुले यांच्यासोबत नाहीत. तुम्ही तुमचे कुटुंब आणि तुमचे पाटणकर हाच परिवार आहे. ठाकरे घराण्यात त्यांचे विचार कोणासोबत जुळत नाहीत शिवसेनेतील अनेक जुन्या नेत्यांवर हल्ले करण्यास ठाकरे यांनी सांगितले होते. आनंद दिघे यांच्या निधनानंतर त्यांच्या मालमत्तेची चौकशी केली होती. कोणी जमीन दाखविण्याची गरज नाही. तुम्ही आपोआप जमिनीवरच आला आहात पंतप्रधान गृहमंत्र्यांबाबत बोललात, त्यातील काही कळते का ? असा सवालही त्यांनी केला.

पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा आणि यांचे फोटो वापरून शिवसेनेचे आमदार निवडून आले आणि आता त्यांच्यावर टीका करता ? भाजपाच्या नेत्यांना बोललात तर महाराष्ट्रत सभा होऊ देणार नसल्याचे इशारा ठाकरे यांना देत भाजपच्या नेत्यांवर बोलणार नाही, असे आधी प्रतिज्ञापत्रावर लिहून द्यावे, मग सभा होऊ देऊ असेही राणे यांनी सांगितले. मुख्यमंत्री शिंदे यांनी संरक्षण काढले तर फिरणे अवघड होईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

Check Also

मेहबूबा मुफ्ती यांचे निवडणूक आयोगाला पत्रः कार्यकर्त्यांना अटक करण्याचे थांबवा

जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) च्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *