Breaking News

आशिष शेलार यांचा आरोप, ठाकरे सरकारमुळे …महापालिकेच्या ठेवी घटल्या

ठाकरे सरकारच्या काळात मुंबईतील बिल्डरांना केलेला ५०% प्रिमियम माफीमुळे मुंबई महापालिकेच्या ठेवींमध्ये घट झाली, असा आरोप मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी आज येथे केला.

महायुतीतर्फे आज मुंबई उपनगराचा मेळावा रंग शारदा सभागृहात तर शहर विभागाचा मेळावा यशवंतराव चव्हाण सेंटरच्या सभागृहात पार पडला. यावेळी केलेल्या भाषणामध्ये मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड शेलार यांनी उबाठा गटावर जोरदार हल्लाबोल केला. तत्कालीन पर्यावरण मंत्री आणि वरळीचे आमदार कुठे भेटतील का? म्हणून वरळीतील लोक त्यांना शोधत आहेत. वरळीतून आमदार गायब, अशी स्थिती आहे. यांचे विमान कधी जमिनीवर येतच नाही, अशा शब्दातही आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता जोरदार टीका केली.

पुढे बोलताना आशिष शेलार म्हणाले की, मुंबई महापालिकेची डिपॉझिट कमी झाली म्हणून आता ओरडत आहेत, शिंदे सरकार आल्यानंतर विकास कामे सुरू झाली, विकास कामांना निधी वापरला गेला, त्यामुळे मालमत्तांमध्ये साडेचौदा टक्के वाढ झाली. पुल उभे राहिले, रस्ते उभे राहिले, डिपॉझिट कमी होण्याचे खरे कारण तत्कालीन ठाकरे सरकारने बिल्डरांवर ५०% प्रीमियम माप ची खैरात केली. त्यामुळे महापालिकेतील तिजोरीत येणारा निधी आला नाही आणि त्यामुळेच महापालिकेच्या ठेवी कमी झाल्या, असा आरोपही केला.

उपस्थितांना आव्हान करताना आमदार आशिष शेलार म्हणाले की, सकाळी नऊ वाजता टीव्ही बघू नका! पत्रकार पोपटलाल बोलत राहतील, छत्री घेऊन फिरतात, कधी मान अशी, कधी हात असा, बाकी काही नाही.. राज्याला देण्यासारखं काही नाही..या पत्रकार पोपटलाल आणि कंपनीने मुंबईचे केलं तेवढं नुकसान अन्य कोणीच केले नाही, अशा खोचक शब्दात संजय राऊत यांच्यावर टीका केली.

आशिष शेलार म्हणाले की, विचारांसाठी उठाव करणाऱ्यांना तुम्ही गद्दार म्हणता? महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जर तीच भाषा वापरायची असेल तर महाराष्ट्रातल्या जनतेशी, मराठी माणसाशी, महायुतीशी, मुंबईकरांशी गद्दारी कोणी केली असेल तर ..दुर्दैवाने उद्धवजी तुम्ही गद्दारी केलीत.. इथे मंचावर बसलेला कोणी नाही, असा टोलाही लगावला.

भाजपाच्या कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आम्ही एकत्र आलो तो निर्णय देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे आपण एकत्र आलो कारण निर्णय अजित पवारांनी घेतला आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना माझी विनंती राहील हा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. आणि आरपीआयच्या कार्यकर्त्यांना माझे निवेदन राहील, हा निर्णय रामदास आठवले यांनी घेतला आहे. त्यामुळे आपली महायुती इतकी भक्कम आहे, असे सांगत आशिष शेलार यांनी कार्यकर्त्यांना काही सूचनाही केल्या.

Check Also

संध्या सव्वालाखे यांचा आरोप…भाजपा सरकार महिला अत्याचार रोखण्यात अपयशी

भारतीय जनता पक्ष बेटी बचाओ, बेटी पढाओ, लेक लाडकी, लाडली बहना यासारख्या योजनांचा गाजावाजा करते …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *