Breaking News

अजित पवारांचा पलटवार, त्या चंद्रशेखर बावनकुळेंना म्हणावं जरा बोलण्यात… ४४० व्होल्टच्या टीकेवर अजित पवारांची तुफान टोलेबाजी

चिंचवड आणि कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणुक बिनविरोध करण्याचे सर्व प्रयत्न भाजपा-शिंदे गटाचे अधुरेच राहिले. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघात महाविकास आघाडीने आपले उमेदवार उभे केले. त्यामुळे चिंचवड आणि कसबा मतदारसंघातील प्रचार शिगेला पोहोचला आहे. भारतीय जनता पार्टीसह महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचार केला जात आहे. प्रचार शिगेला पोहोचला असताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर निशाणा साधत मतदान करताना ईव्हीएमचे बटन इतक्या जोरात दाबा की अजित पवारांना ४४० व्होल्टचा झटका बसला पाहिजे अशी टीका केली. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या टीकेला अजित पवार यांनी तितक्याच उपरोधिक पणे प्रत्युत्तर देत म्हणाले, त्या चंद्रशेखर बावनकुळेंना म्हणावं जरा बोलण्यात तारतम्य ठेवा. एका सत्ताधारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत अशी आठवण करून देत उपरोधिक टोला लगावला.

चिंचवड मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारासाठी अजित पवार आले असता ते बोलत होते.

काही दिवसांपूर्वी अजित पवारांवर निशाणा साधताना बावनकुळे म्हणाले, येत्या २६ तारखेला इतक्या जोरात ईव्हीएमचे बटण दाबा की ४४० व्होल्टचा करंट लागला पाहीजे. पुन्हा अजित पवारांनी चिचंवडचे नाव घेतले नाही पाहीजे, याची काळजी तुम्ही घ्या, असे आवाहन बावनकुळे यांनी केले. बावनकुळेंच्या या आवाहनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपरोधिक टोलेबाजी केली. मला ४४० व्होल्टचा करंट लागला तर मी मरूनच जाईल, असं उपरोधिक प्रत्युत्तर दिले.

चंद्रशेखर बावनकुळेंच्या विधानाबाबत विचारलं असता अजित पवार म्हणाले की, अरे बापरे… ४४० व्होल्टचा करंट म्हणजे मी मरून जाणार… एवढा मोठा करंट बसल्यावर मी कसा काय जगू शकतो? आता माझ्या मतदारांना आणि कार्यकर्त्यांना सगळ्यांना आता श्रद्धांजली अर्पण करावी लागेल की काय? अशी उपरोधिक टोलाही बावनकुळे यांना लगावला.

अजित पवार पुढे म्हणाले, त्या चंद्रशेखर बावनकुळेंना म्हणावं जरा बोलण्यात तारतम्य ठेवा. आपण एका सत्ताधारी पक्षाचे अध्यक्ष आहात. उगीच आपल्याला बोलण्याची संधी मिळाली म्हणून उचलली जीभ लावली टाळ्याला, असं करू नका. काहीतरी तारतम्य ठेवा. मानसिक संतुलन बिघडू देऊ नका.

Check Also

मेहबूबा मुफ्ती यांचे निवडणूक आयोगाला पत्रः कार्यकर्त्यांना अटक करण्याचे थांबवा

जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) च्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *