Breaking News

अजित पवार यांची घोषणा, बारामती राज्यात पहिल्या क्रमांकावर आणणार

मराठवाडा, विदर्भातील महारोजगार मेळाव्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील मेळाव्याचे आयोजन अहमदनगर नंतर बारामती येथे करण्यात आले. या मेळाव्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे उपस्थित होते. तर स्थानिक खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार हे आवर्जून उपस्थित होते. यावेळी अजित पवार बोलताना म्हणाले की, मागील अनेक वर्षापासून बारामतीतील नागरिकांच्या विकासासाठी प्रयत्न करत आहे. तसेच जनतेला आवश्यक लागणाऱ्या गोष्टीसाठी दुसऱ्या ठिकाणी जावे लागू नये या उद्देशाने आपण विकास कामांवर भर देत आहोत. राज्यात पहिल्या क्रमांकाचा तालुका म्हणून ओळखला जावा अशा पध्दतीचा विकास करण्याचा प्रयत्न करणार असल्याची घोषणा यावेळी केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, बारामतीच्या वैभवात भर घालणाऱ्या चार सुंदर इमारतींचे आज लोकार्पण करण्यात आले. पोलीस उप मुख्यालयाच्या इमारतीसाठी १३२ कोटी रुपये, पोलीस वसाहत साठी ७५ कोटी रुपयांचा खर्च आला. बारामतीचे नूतन बस स्थानक महाराष्ट्रातील क्रमांक एकचे बस स्थानक आहे. खूप चांगल्या दर्जाची कामे झाली आहेत. विविध विकास कामांसाठी निधीची देखील कमतरता कमी पडू दिली जाणार नाही.

अजित पवार म्हणाले की, पोलीस विभागाला पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. आज ३९ वाहनांचा लोकार्पण सोहळा पार पडला त्यात १४ महिला वाहन चालक आहेत. महिलांना देखील संधी प्राप्त करून दिली जात आहे. महाराष्ट्रात बारामती हा क्रमांक एकचा तालुका येण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी सांगितले.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, राज्याने जर्मनीबरोबर एक करार केला असून त्यांना ५ लाख कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे. त्यासाठी मनुष्यबळ कौशल्य प्राप्त करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आजच्या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून अधिकाधिक उमेदवारांना रोजगार मिळवा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कृषीमूल शिक्षण संस्था आयटीआय तसेच मालेगाव येथील शासकीय आयटीआय येथे विविध १५ ते ३० दिवसांचे कौशल्य विकास अभ्यासक्रम राबविण्यात येणार असून विद्यार्थ्यांना त्यातून रोजगार मिळू शकणार आहेत, अशी माहितीही दिली.

बेरोजगार तरुणांना रोजगार देण्यासाठी कौशल्य विभाग कटिबद्ध-मंगल प्रभात लोढा

मंगलप्रभात लोढा म्हणाले, महाराष्ट्रात प्रथम नागपूर येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते. त्या रोजगार मेळाव्यात चांगला प्रतिसाद मिळाला. बारामती येथील रोजगार मेळाव्यात उद्योजकांनी ५५ हजार ५५७ रिक्तपदे अधिसूचित केली आहेत. याठिकाणी २५४ उद्योजकांनी सहभाग घेतला असून ३८ हजार ७४४ उमेदवारांनी नोंदणी केली आहे. याव्यतिरिक्त ऑनलाईन नोंदणी देखील मोठ्या प्रमाणात झाली आहे. या वर्षीच्या अर्थसंकल्पात कौशल्य विभागासाठी भरीव तरतूद केली आहे. त्याच्या माध्यमातून राज्यातील १ हजार महाविद्यालयात नोकरीच्या दृष्टीने ३ महिन्याचे कौशल्य विकासाचे कोर्स सुरू करण्यात येतील. राज्यातील बेरोजगार तरुणांना जो पर्यंत रोजगार मिळत नाही तो पर्यंत कौशल्य विभाग विविध प्रशिक्षणाच्या माध्यमातून नोकरी देण्यासाठी प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या आयुक्त निधी चौधरी म्हणाल्या, विभागाच्यावतीने युवक युवतींच्या पंखांना बळ देण्याचे काम करतो. २ हजार ठिकाणी प्रमोद महाराज कौशल्य विकास केंद्र उभारण्यात येणार असून सहा ठिकाणी आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास केंद्रांची उभारणी करत आहोत. पहिला नमो महारोजगर मेळावा १० डिसेंबर का नागपूर केला होता त्याची फलश्रुती पाहून ३ महसुली विभागात आयोजित मेळाव्यात ४० हजार मुलांना रोजगार देण्यात आले, अशी माहिती त्यांनी दिली.

कार्यक्रमाला विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे महाव्यवस्थापक मनोज कुसेकर, विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, क्रीडा आयुक्त डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण आदी उपस्थित होते.

Check Also

ऑनलाईन गेमिंग क्षेत्रातील तरूणाईशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील अव्वल ऑनलाईन गेमिंग क्षेत्रातील गेमरशी संवाद साधला. मात्र यागेमर्सनी पंतप्रधान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *