Breaking News

अजित पवार म्हणाले, खरं तर हा विषय मुख्यमंत्र्यांच्या अंतर्गत येतो पण… सप्तश्रृंगी गडाच्या ८१ कोटी ८६ लाखाच्या पर्यटन विकास आराखड्यास मंजूरी देणार

वास्तविक पाहता हा विषय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारीत येतो. पण मी तुम्हाला शब्द देतो की, मी उद्याच मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून बैठक घ्यायची विनंती करून सप्तश्रुंगी गडाच्या विकासासाठी ८१.८६ लाख रूपयांच्या निधीस मंजूरी देतो. आणि तसे पत्र तुम्हाला दिसेल अशी घोषणा उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी नाशिक जिल्ह्यातील कळवण येथील जाहिर कार्यक्रमात उपस्थितांसमोर केली.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, मगाशी माझ्या हस्ते पुजा होताना काही गोष्टी माझ्या लक्षात आल्या. तसेच इतर भाविकांनाही काही अडचणींना सामोरे जावे लागत असेल. त्यामुळे आगामी काळात येथील सोयी-सुविधांच्या कामात सुधारणा करणे आवश्यक असल्याने निधीची आवश्यकता राहणार आहे.

यावेळी व्यासपीठावर विधासभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, खासदार सुनिल तटकरे, आमदार माणिकराव कोकाटे, दिलीप बनकर, नितिन पवार, हिरामण खोसकर, डॉ. रावसाहेब शिंदे, कळवण प्रकल्प अधिकारी विशाल नरवाडे, नगराध्यक्ष कौतिक पगार, माजी जि.प. अध्यक्ष जयश्री पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, नाशिक जिल्ह्यातील सप्तश्रृंगी गड देवस्थान हे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आहे. येथे येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी व पर्यटनाच्या दृष्टीने करण्यात आलेल्या ८१ कोटी ८६ लाखाच्या पर्यटन विकास आराखड्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत होणाऱ्या बैठकीत मंजूरी देण्यात येईल. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून योजनांची अमंजबजावणी शासनस्तरावर करण्यात येत आहे. विविध विकास कामांवरील असलेली स्थगितीही शिथिल झाली असून येणाऱ्या काळात प्रस्तावित विकासकामांनाही मंजूरी देण्यात येवून आर्थिक तरतूद केली जाईल. शेतकऱ्यांच्या हितास प्राधान्य देवून कळवण तालुक्यातील ओतूर धरणासाठी सुधारित प्रशासकीय मान्यतेस मंजूरी देण्यात येणार असून हा प्रश्न निकाली निघणार आहे. शेतकऱ्यांसाठी शासनाने शुन्य टक्के व्याजदराने ३ लाखांपर्यंत कर्ज देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला असून शेतकऱ्यांना याचा निश्चितच लाभ होत असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना वित्त पुरवठा करणारी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस उर्जितावस्थेसाठी शासनस्तरावर तोडगा काढला जाईल. परंतु यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते कळवण व सुरगाणा तालुक्यातील ४९४ कोटींच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. चणकापूर धरण परिसरात माजी मंत्री स्वर्गीय ए.टी. पवार यांचे स्मारक उभारण्यासाठी सकारात्मक विचार करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी यावेळी सांगितले. गुजरात राज्यातील सापुतारा पर्यटन स्थळाच्या धर्तीवर आदिवासी जनतेला रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी सुरगाणा व कळवण तालुक्यात पर्यटनास चालना देण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येईल. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्रमुख रस्त्यांचा विकासाच्या दृष्टीने आराखडा तयार करण्यात येईल.

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ म्हणाले, नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध असून येणाऱ्या काळातही शेतकऱ्यांच्या अडचणी प्राधान्यक्रमाने सोडविल्या जातील. कळवण व सुरगाणा तालुक्याच्या विकासासाठी विशेष प्रयत्न शासनस्तरावर करण्यात येणार असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ म्हणाले, शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या अश्वासनाचे स्वागत आहे. कळवण व सुरगाणा तालुक्यातील आदिवासींच्या विकास कामे, वनपट्टे प्रश्न यावर सकारात्मक भूमिका शासनस्तरावर घेण्यात यावी अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

याप्रसंगी आमदार नितिन पवार यांनी आपल्या मनोगतात कळवण व सुरगाणा तालुक्यात झालेल्या विविध विकास कामांची माहिती दिली तसेच भविष्यात करावयाच्या कामांना शासनस्तरावर मंजूरी देण्याची अपेक्षा व्यक्त केली. यावेळी खासदार सुनिल तटकरे यांनीही मनोगत व्यक्त केले.

Check Also

मल्लिकार्जून खर्गे यांचे न्यायपत्रवरून पंतप्रधान मोदींना भेटण्यास उत्सुक

लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने काँग्रेस भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपाचे रणधुमाळी चांगलीच गाजत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *