Breaking News

छगन भुजबळांचा उद्योग मंत्र्यांना प्रश्न, निवडणूका झाल्या; गुजरातला गेलेले उद्योग परत येणार का? राहुल नार्वेकर यांचा टोला, भुजबळ साहेब आता काय अभिनंदनाचा ठराव मांडणार का?

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर वेदांता-फॉक्सकॉन, टाटा एअरबस, बल्क, ड्रग्ज पार्क सारखे मोठे प्रकल्प गुजरातला नेल्यावरून तत्कालीन उद्योग मंत्री सुभाष देसाई, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांनी आकाशपाताळ एक करत शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठविली. मात्र प्रत्यक्ष ज्यावेळी हा प्रश्न विधानसभेत महाविकास आघाडीतील माजी मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित केला. त्यावेळी ना शिवसेना सदस्यांनी ना महाविकास आघा़डीच्या इतर आमदारांनी प्रश्नावर साधा उपप्रश्नही उपस्थित केला नाही. मात्र भुजबळांच्या प्रश्नावर विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी चिमटा काढला.

विधानसभेत प्रश्नोत्तराचा तास सुरु झाल्यानंतर श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे यांनी श्रीरामपूर येथील एमआयडीसीतील केमिकल फॅक्टऱ्यांचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिले. या प्रश्नाला लागूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी आमदार छगन भुजबळ यांनी उपप्रश्न उपस्थित केला. यावेळी छगन भुजबळ यांनी प्रश्न विचारताना म्हणाले, शिंदे-फडणवीस सरकार राज्यात स्थानापन्न झाल्यानंतर गुजरातला वेदांत-फॉक्सकॉन, बल्क ड्रग्ज पार्क आणि टाटा कंपनीचा एअर बस प्रकल्प गुजरातला नेला गेला. त्यानंतर गुजरातच्या निवडणूका झाल्या. त्या निवडणूकीत तेथील सत्ताधारी पक्षाला भरघोस यशही मिळाले. आता ते गेलेले उद्योग परत महाराष्ट्रात परत आणणार का अशी विचारणा उद्योग मंत्री उदय सामंत यांना विचारला.

त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर छगन भुजबळांना चिमटा काढताना म्हणाले, भुजबळ साहेब आता काय त्या विजयाबद्दल सभागृहात अभिनंदनाचा ठराव मांडणार का असे मिश्कील सवाल केला.

त्यानंतर उद्योग मंत्री उदय सामंत उत्तर देताना म्हणाले, खरे तर हा प्रश्न उपस्थित होऊन यावर चर्चा व्हायला हवी. परंतु बरं झाले हा प्रश्न उपस्थित केलात. या माझ्याकडे असलेल्या कागदपत्रांनुसार मागील १८ महिन्यात हाय पॉवर कमिटीची बैठकच झाली नाही. त्यामुळे हे सर्व मोठे उद्योग गुजरातला गेले. तसेच त्यासंदर्भात त्यावेळी असलेल्या मुख्यमंत्र्यांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचे सांगत असताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी खाली बसूनच उदय सामंत यांना लवकर संपव अशा आशयाचे हातवारे करत होते.

त्यामुळे या प्रश्नावर शिंदे-फडणवीस सरकारला घेरण्याची संधी असतानाही विरोधकांमधील काँग्रेस, शिवसेनेच्या एकाही सदस्याने याबाबत पुन्हा प्रश्न-उपप्रश्न विचारला नाही. तेवढ्यात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पुढील प्रश्न पुकारला.

Check Also

संभाजीनगरमध्ये शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना उबाठा गटाचे कार्यकर्त्ये एकमेकांसमोर

लोकसभा निवडणूकीच्या चवथ्या टप्प्यासाठी १३ मे ला मतदान होत आहे. महाराष्ट्रातील ११ लोकसभा मतदारसंघातही मतदान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *