Breaking News

हल्ला केला म्हणून सोमय्या गप्प बसणार नाहीत, जशास तसे उत्तर देऊ भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेला इशारा

मराठी ई-बातम्या टीम

हल्ला केला म्हणून किरीट सोमय्या स्वस्थ बसणार नाहीत, भारतीय जनता पार्टी कायदेशीर पद्धतीने जशास तसे उत्तर देईल, असा इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिला.

भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर शिवसैनिकांनी केलेल्या हल्ल्याबाबत प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील बोलत होते.

ते म्हणाले की, सभ्यतेचा पांघरलेला बुरखा आता फाटला असून सर्व ठिकाणी राज्यातील सत्ताधाऱ्यांचा मूळ चेहरा दिसू लागला आहे. मुद्दे संपल्यामुळे ते गुद्द्यांवर आले आहेत. भावना गवळी यांच्या प्रकरणात यवतमाळमध्ये किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला करण्यात आला म्हणून ते घाबरून घरी बसले नाहीत. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रकरणात तर किरीट सोमय्या यांना त्यांच्या मुंबईतील निवासस्थानीच स्थानबद्ध करायचा प्रयत्न झाला. पण त्यामुळे ते घाबरून घरी बसले नाहीत. आजच्या शिवसैनिकांच्या हल्ल्यांमुळेही सोमय्या घाबरून गप्प बसणार नाहीत.

आमचा कायद्यावर विश्वास आहे आणि आम्ही कायदेशीरपणेच उत्तर देऊ. पण जशास तसे उत्तर दिले जाईल असे ते म्हणाले.

शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांचे पार्टनर सुजित पाटकर यांनी बोगस कंपन्याची कागदपत्रे सादर करत पुणे येथील जम्बो कोविड सेंटरचे कंत्राट मिळविल्याचा आरोप भाजपाचे मादी खासदार किरीट सोमय्या यांनी करत यासंदर्भात शिवाजीनगर येथील पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर सोमय्या यांनी पुणे महापालिकेच्या आयुक्तांकडे तक्रार करण्यासाठी पुणे महापालिकेत गेले असता तेथे आधीच असलेल्या शिवसैनिकांनी किरीट सोमय्या यांना निवेदन देण्याचा प्रयत्न केला. तसेच सोमय्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.

त्यावेळी सोमय्या यांच्या सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसांनी सोमय्या यांना शिवसैनिकांच्या गराड्यातून बाहेर काढताना धक्काबुक्की झाली. त्यावेळी किरीट सोमय्या हे महापालिकेच्या पायरीवर पडले. तरीही पोलिसांनी त्यांना गाडीत बसवून तेथून बाहेर नेले. त्यानंतर सोमय्या यांनी संचेती हॉस्पीटलमध्ये जावून स्वत:ला झालेल्या दुखापतीची तपासणी केली. या घटनेवरून अखेर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला इशारा दिला.

Check Also

राजकीय पक्ष व उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे

राजकीय पक्षांनी सार्वत्रिक लोकसभा निवडणूक, २०२४ च्या कालावधीमध्ये आदर्श आचारसंहितेचे पालन करणे आवश्यक आहे.निवडणूक काळामध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *