राज्यात गणेशोस्तवाला सुरुवात झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दररोज भाजपा आणि शिंदे गटाला समर्थन देणाऱ्या कोणत्या ना कोणत्या राजकीय नेत्यांच्या घरी जावून गणपतीचे दर्शन घेत आहेत. त्यातच त्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या घरीही गेले होते. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांच्या या घरगुती दौऱ्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एकनाथ शिंदेवर टीका करताना म्हणाल्या की, साम-दाम-दंड भेदचा वापर करून आणि ५० खोके सर्व काही ओके करून हे सरकार ओरबडून आणलं. पण मागील अडीच महिन्यात काहीही काम झालं नाही, अशी टीका केली.
सुप्रिया सुळे यांनी केलेल्या टीकेला भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रत्युत्तर देत म्हणाले, महाराष्ट्रात पवार कुटुंबीय सोडून कुणी मोठं झालेलं सुप्रिया सुळे यांना सहन होत नाही. हेच त्यांचं मोठं दुखणं आहे, अशी टीका केली.
पुढे बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले, महाराष्ट्रात पवार कुटुंबीय सोडून कुणी मोठं नाही, हेच सुप्रिया सुळे यांचं सर्वात मोठं दु:ख आहे. त्यांचे वडील शरद पवार हेच या राज्याचे मुख्य आहेत. तेच राज्यामध्ये काहीतरी राजकीय बदल करू शकतात, असं त्यांना वाटतं. या विचाराला एकनाथ शिंदेंनी छेद दिला आहे आणि देवेंद्र फडणवीसांनी त्यांना फार मोठी साथ दिली.
भारतीय जनता पार्टीने एका सर्वसामान्य मराठा कुटुंबातील एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदी विराजमान केलं, हे सगळ्यात मोठं दुखणं पवार कुटुंबीयांचं आहे. अजित पवारही फुटले होते, पण त्यांच्यामागे दोन आमदारही राहिले नाहीत. एकनाथ शिंदेमागे ५० आमदार ठामपणे उभे राहिले. त्यामुळे पवार कुटुंबाच्या पोटातील दुखणं वेगळं आहे आणि ते बोलतात वेगळं… मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एवढ्या चांगल्या पद्धतीने काम करत आहेत, हे त्यांना सहन होत नाहीये अशी बोचरी टीकाही केली.