Breaking News

गुजरात न्यायालयाच्या निर्णयावर नाना पटोले यांचा सवाल, ललित मोदी, नीरव मोदी हे…? राहुल गांधींवरील कारवाई राजकीय द्वेषातून, सर्वोच्च न्यायालयात जाऊ

राहुल गांधी यांच्याविरोधात खोटी तक्रार करुन राजकीय द्वेषातून जाणीवपूर्वक कारवाई केलेली आहे. राहुल गांधी यांनी कोणत्याही समाजाचा अपमान केलेला नाही परंतु राहुल गांधी यांना घाबरवण्याचा प्रयत्न भाजपा गलिच्छ राजकारणातून करत आहे. देशातील कायदे सर्वांना समान आहेत व काँग्रेसचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. कोर्टाच्या निकालावर प्रतिक्रिया देता येत नाही, परंतु राजकीय द्वेषातून राहुलजींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे असे मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले.

राहुल गांधी यांची याचिका गुजरात उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर राज्यभरात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक होत रस्त्यावर उतरले व हुकुमशाही मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी करत तीव्र आंदोलन केले. ठाणे येथे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपा व मोदी सरकारवर तोफ डागली. ते पुढे म्हणाले की, राहुल गांधी यांच्यावरील कारवाई ही राजकीय द्वेषातून करण्यात आलेली असून त्यामागे कोणती शक्ती आहे हे सर्वांना माहित आहे. राहुल गांधी यांची याचिका गुजरात उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. परंतु याविरोधात काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात दाद मागेल. ही लढाई मोठी आहे आणि देशातील हुकुमशाही विरोधात काँग्रेस लढत आहे. राहुल गांधी यांनी भ्रष्ट नीरव मोदी, ललित मोदी यांच्याविरोधात टीका केली होती. भ्रष्ट लोकांवर टीका केली तर ती एखाद्या जातीविरोधात कशी होऊ शकते?

नीरव मोदी, ललित मोदी यांनी जनतेचे कोट्यवधी रुपये लुटून परदेशात पळून गेले, हे मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कोण लागतात, त्यावर नरेंद्र मोदी बोलत का नाहीत? त्यांच्यावर कारवाई का करत नाहीत? मोदी सरकार घाबरलेले असून सत्तेपासून दूर जात असल्याच्या भीतीपोटी कारवाई केली आहे. भाजपाची ही कृती लोकशाहीचा गळा घोटणारी तसेच लोकशाहीला कलंक लावणारी आहे.

तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम द्रुतगती मार्गावर विलेपार्ले येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर रास्ता रोको आंदोलन करून भाजपा सरकारचा निषेध केला. यावेळी उत्तर मध्य जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष जगदीश अमीन, मुंबई महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अनिशा बागुल यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना नसीम खान म्हणाले मोदी सरकार राहुल गांधींना घाबरले आहे म्हणून त्यांचा आवाज दडपण्यासाठी त्यांच्यावर खोट्या केसेस दाखल करत आहे. पण राहुल गांधी या असल्या दडपशाहीला घाबरणार नाहीत आम्ही सर्वजण देशातील कोट्यवधी काँग्रेस कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.

मुंबईतील दहिसर भागात माजी मंत्री अस्लम शेख यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले तसेच राज्याच्या विविध भागातही काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून मोदी सरकारविरोधात तीव्र आंदोलन केले.

Check Also

प्रज्वल रेवन्ना याच्या परदेशी पळून जाण्याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा

परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, लैंगिक शोषणाच्या आरोपांप्रकरणी चौकशीला सामोरे जात असलेले कर्नाटकचे खासदार प्रज्वल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *