Breaking News

आशिष शेलार यांचा सवाल, उद्धव ठाकरेंचा मातोश्री ३ चा प्लॅन आता चंद्रावर नाही ना….? हिंगोलीतील सभेतील उद्धव ठाकरे यांच्या टीकेवर शेलारांचा पलटवार

पाकिस्तानने शुभेच्छा दिल्यानंतर चंद्रयान मोहिमेच्या शुभेच्छा आणि अभिनंदन उद्धवजी तुम्ही का केलं? त्या अगोदर तुम्ही शास्त्रज्ञांचे अभिनंदन का केले नाही? अशी कुठली गोष्ट तुमच्या मनाला टोचत होती? जी भारताने कमावली, शास्त्रज्ञांनी मिळवली, जगाने पाहिली, पण मला नाही बरी वाटली अशी कुठली गोष्ट होती? तुम्ही शास्त्रज्ञांचे अभिनंदन केलं नाही? एक पत्र, एक शुभेच्छा, अभिनंदन देखील केलं नाही? पाकिस्तानने शुभेच्छा दिल्यानंतर उद्धवजींची प्रतिक्रिया आली. मग उद्धवजी,तुमच्या प्रतिक्रियांची स्क्रिप्ट अन्य कुठे मंजूर होते का? त्यानंतर आपण बोलता का? असा आज जनतेच्या मनातला प्रश्न आहे…आणि मग चंद्रावरच्या घराची गोष्ट करायची असेल तर, तुमच्यावर असाही मुंबईकरांचा, देशवासियांचा विश्वास नाही, त्यामुळे उद्धवजींनी उपहासात्मक केलेले विधान हे सहजतेने घेऊ नका, असे आम्ही नम्रपणे सांगतो.मला तर आता अशी शंका आहे की,भ्रष्टाचाराची पुंजी इतकी वाढल्यानंतर मातोश्री एक झालं, मातोश्री दोन झालं,आता उरलेल्या पैश्यात चंद्रावर मातोश्री तीनचा विचार तर उद्धवजींच्या मनात नाही ना? त्याकरिता उद्धवजी तुम्ही उपाहासाने बोलताय का? हा जनतेच्या मनात प्रश्न आहे, असा खोचक सवालांची सरबत्तीच मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड.आशिष शेलार यांनी सोमवारी येथे एका पत्रकार परिषदेत बोलताना केली.

पत्रकारांच्या प्रश्नांवर बोलताना आशिष शेलार यांनी यावेळी जोरदार पलटवारही केला. उद्धव ठाकरे यांच्या सभा म्हणजे सार्वजनिक रडण्याचा, रुदालीचा कार्यक्रम असतो. केवळ दुसऱ्याच्या घरात डोकावणे, दुसऱ्याच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देणे, दुसऱ्याच्या कार्यक्रमावर चर्चा करणे, एवढाच कार्यक्रम सध्या सुरु आहे.स्वतःचा कार्यक्रम, धोरण नसलेल्या पक्षाचे नाव म्हणजे उद्धव ठाकरे यांचा पक्ष होय.परंतू पातळी सोडून बोलण्याची भाजपची पद्धती नाही. त्यामुळे नम्रपणे आमचे सांगणे आहे की, मर्यादा ठेवा. मर्यादेत रहा, भाजपचा प्रामाणिकपणा हा दुबळेपणा नव्हे,असा सूचक इशाराही त्यांनी दिला.

तुमची आज अशी स्थिती झाली आहे की,ज्या वेळेला तुम्ही बाहेर निघतात त्यावेळेला तुमचा पक्ष कुठला? मागचे नगरसेवक निघून गेले,मागे पक्षात आमदार बघितले तर ते पळून गेले, मागचे खासदार सोडून गेले आणि म्हणून आम्हाला म्हणायचं ते आम्ही म्हणणार नाही, पण तुमची अवस्था शोले मधल्या “असरानी” सारखी झालेली आहे.आम्हालाही तुम्हाला घरबशा म्हणायचं नाही,घर कोंबडा म्हणायचं नाही,तात्या विंचू म्हणायचं नाही,काहीच म्हणायचं नाही.. आणि म्हणणारही नाही… मात्र अहंकारामुळे तुमच्या पक्षातील तुमचे स्थान काय याचं जनतेत मूल्यमापन काय झालं आहे याचा विचारही तुम्ही करायला पाहिजे, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

ही तर परिवार वाचवण्यासाठी धडपड..

इंडियाची बैठक म्हणजे पारिवारिक कार्यक्रमाला जास्त प्राधान्य देशहिताला नाही.जे होणारच नाही पण कल्पनाच जर करायची असेल आणि रंगवायचं जर असेल, तर हे कधी चुकून सत्तेत आले तर पक्ष,लोकसभा,राज्यसभा घेऊन जातील आणि परिवाराबरोबर पर्यटन करत बसतील.विदेशात जातील, त्यामुळे ही उडणारी फुलपाखरं आहेत. या फुलपाखरांच्या जीवावर देशहित साध्य होणार नाही, हे देश आणि जनता चांगलेच जाणते. ही सगळी धडपड देशासाठी नसून आपले परिवारवादी पक्ष वाचवण्यासाठी केविलवाणी केलेली धडपड असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

शेतकऱ्यांबद्दल बोलायचं तुम्हाला अधिकार आहे का…?

तुम्ही घरी बसला होतात..काय केले? सांगा ना कुठे नांगर घेऊन गेलात? कुठे बियाणे घेऊन गेलात?कुठे शेतकऱ्याला मदतीला गेलात? कुठे पाणी टंचाईला मदत केलीत? कुठे शेतकऱ्यांच्या डेलिकेशनला भेटलात? तुम्ही घरामध्ये बसायचे,घराबाहेर पडायचं नाही.पण राज्याचे उपमुख्यमंत्री राज्य हितासाठी हजारो कोटींचा उद्योग आणण्यासाठी गेले तर अडचण काय? राज्याचे उपमुख्यमंत्री मुंबईवासियांना वडाळा पर्यंतची अंडरग्राउंड मेट्रो ११साठी मदत घेऊन आले, तर तुमच्या पोटात का दुखतयं? उद्धवजी..! तुम्हाला आमचा सवाल आहे की, मुंबईसाठी टोकियो सारखा पूरमुक्तीचा आराखडा बनवण्याची भूमिका उपमुख्यमंत्र्यांनी मुंबईच्या हिताची घेतली तर तुम्हाला का त्रास होतोय ? तिथे असताना त्यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा सुद्धा विचार केला. मात्र उद्धवजी..! तुम्ही घरात एसी बाहेरच्या रूममध्ये सुध्दा आले नाहीत.शेतकऱ्यांबद्दल बोलायचं तुम्हाला अधिकार आहे का? असा परखड सवालही आ.शेलार यांनी विचारला.

वरळीत पण दहिहंडी होणार…!

मुळात मुंबई व परिसरात साजरा होणारा गोविंदा वाचवण्यासाठी एक ठोस भूमिका घेवुन न्यायालयातील लढाई ही भाजपने,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आम्ही लढलेली आहे. त्यावेळेला हे सगळे लोक घरात बसून होते.आम्ही स्टूलावर उभ राहून मटकी फोडायची का? हे वक्तव्य करत बसले होते.त्यामुळे गोविंदा आणि हिंदू सणांची लढाई भाजपने लढली आहे. आम्ही गणपतीसाठी लढलो,गोविंदा साठी लढलो,आता तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार यांनी पुढाकार घेतला असून गतवर्षीप्रमाणे यंदाही दहिहंडी उत्सवात फक्त भाजपाच दिसेल,आणि वरळीतही दहिहंडी होईल त्याचा टिझर लवकरच रिलीज करु असेही त्यांनी निक्षून बजावले.

….दोषींना वाचवायला मदत करताय का…..?

प्रख्यात कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या मृत्यूचे राजकारण करता कामा नये,अशी आमची स्पष्ट भूमिका आहे. त्यांच्या दुर्दैवी मृत्यूला,आत्महत्येला जे जबाबदार आहेत,जे दोषी आहेत, त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. पण माझा सवाल आहे की, संजय राऊत किंवा उद्धवजी तुम्ही नितीन देसाई यांच्या अंत्ययात्रेला गेलात का? त्यांचे अंतदर्शन घेतलेत का? का शोकभावना प्रगट केल्या नाहीत? त्यांच्या परिवाराला भेटलात का? का नाही भेटलात? राजकारण करायची आमचीही इच्छा नाही.पण आज तुम्ही प्रश्न उपस्थित केला म्हणून विचारावे लागते की,कोणी तुम्हाला नितीन देसाई यांच्या परिवाराला भेटण्यापासून थांबवलं? यासंबंधीचा प्रश्न मी, महाराष्ट्राच्या विधानसभेत मांडला. त्यावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी कारवाईचे आदेश दिले.एफआयआर दाखल झाला.आता जे दोषी आहेत ते स्वतःची अटक वाचविण्यासाठी धावत आहेत.पण त्यावेळी विधानसभेमध्ये उद्धवजी तुमच्या पक्षाचा एकही आमदार का बोलला नाही? म्हणजे हे सगळं तुम्ही जे दोषी आहेत त्या रशेष शहा आणि त्यांच्या माणसांना मदत करण्यासाठी करताय का? हा आमचा आरोप असल्याचा घणाघातही त्यांनी यावेळी केला.

Check Also

संजय शिंत्रे यांचे आवाहन, आचारसंहिता काळात समाज माध्यमांचा वापर करताना दक्षता बाळगावी

सध्या पूर्ण भारतभर लोकसभेच्या निवडणुकीची प्रक्रिया राबवण्याची सुरुवात झालेली आहे. या निवडणूक प्रक्रियेत समाज माध्यमे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *