Breaking News

अजित पवार यांचा सवाल, असं काय घडलंय की १०० लोकांना पोलीस संरक्षण देण्याची वेळ आलीय… सरकारी खर्चाने संरक्षण देण्याची गरज काय

ठाणे जिल्ह्यात संरक्षण दिलेल्या व्यक्ती कोण कोण आणि कुठल्या क्षेत्रातील याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला पण माहिती द्यायला संबधित लोक तयार नाही. ठाणे जिल्हयात व शहरात १०० लोकांना पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. असं काय घडलंय की, १०० लोकांना संरक्षण देण्याची वेळ सरकारवर आली आहे असा संतप्त सवाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यावेळी केला.

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, खासदार ,आमदार यांना संरक्षण दिले याबाबत दुमत नाही. मात्र १०० लोकांना संरक्षण देता, त्यांचा खर्च सरकारच्या तिजोरीवर पडतो. तो खर्च करोडो रुपयांवर जातो. हे संरक्षण कुणाकुणाला दिले आहेत तर त्यामध्ये त्यांचे व्यवसाय वेगवेगळ्या प्रकारचे आहेत त्यांना सरकारी खर्चाने संरक्षण देण्याची गरज नाही. त्यांनी त्यांचे व्यवसाय बदलावे, रितसर व्यवसाय करा म्हणजे धोका असण्याचे कारण नाही असेही सांगितले.

तसेच अजित पवार म्हणाले, माझ्याकडे १०० लोकांची यादी आहे. त्यामध्ये लोकप्रतिनिधी आहेत त्याबद्दल दुमत नाही. सर्वसामान्य लोकांचा जीव धोक्यात आला तर त्यांना संरक्षण देणे हे गरजेचे आहे. त्याबद्दलही आक्षेप नाही पण त्या १०० जणांच्या यादीत निम्म्याच्यावर ज्यांना सरकारी खर्चाने संरक्षण देण्याची अजिबात गरज नाही. फक्त मोठेपणा मिरवण्याकरीता जनतेच्या पैशाच्या जोरावर, सरकारी पैशाच्या जोरावर मोठेपणा वाढवण्याचा प्रयत्न कशाला करत आहात असा रोखठोक सवालही सरकारला केला.

दरम्यान ठाणे जिल्ह्यातील किती व्यक्तींना संरक्षण दिले आहे. त्यांची यादी, त्यांचा हूद्दा जाहीर करावा अशी मागणीही अजित पवार यांनी केली.

संरक्षण कुणाला द्यायचे यासंदर्भात एक समिती असते. संरक्षण देणे हे चुकीचे नाही. परंतु आपण राज्यकर्ते झालो आहोत म्हणून आपल्या जवळच्या बगलबच्च्यांना सरकारी पैशाने संरक्षण देणे हे अजिबात योग्य नाही. ज्याला गरज आहे त्यालाच संरक्षण दिले पाहिजे. जर दिले असेल तर त्याची यादी जाहीर करा. यादी आम्हाला द्या आम्ही त्यावर माहिती घेऊ, जनतेला पण त्यांची माहिती होईल. जनतेचा पैसा अशापध्दतीने खर्च करणे सरकारला शोभा देत नाही अशा शब्दात अजित पवार यांनी सरकारला खडेबोल सुनावले.

शेखर बागडेच्या बेहिशेबी मालमत्तेची एसीबीमार्फत चौकशी करावी…

ठाणे जिल्हयात वरीष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे याने बेहिशेबी मालमत्ता जमा केली असून त्याची एसीबीमार्फत चौकशी करून सत्य समोर आणावे अशी मागणी अजित पवार यांनी यावेळी केली.
दरम्यान याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे रितसर तक्रार करणार आहे असे सांगतानाच शेखर बागडे याच्या मालमत्तेची आकडेवारीच माध्यमांसमोर ठेवली.

एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची एवढी मालमत्ता कशी होऊ शकते बेहिशोबी मालमत्ता तो कशी काय गोळा करु शकतो. याची सरकारने चौकशी करावी. या पोलीस निरीक्षकाची संपूर्ण माहिती कागदपत्रांसहीत आहे असे सांगतानाच पुण्यात एका अतिरिक्त आयुक्तावर सीबीआयने धाड टाकली व त्याच्याकडून सहा कोटी रुपये रोख रक्कम जप्त केली हेही स्पष्ट सांगितले. अशाप्रकारच्या घटना राज्यात मोठ्या प्रमाणावर वाढल्या असून सरकारचा वकुब असायला हवा, सरकारचा दरारा असला पाहिजे तोच राहिलेला नाही अशी टीकाही अजित पवार यांनी केली.

Check Also

भारतीय निवडणूक प्रक्रियेचे चार देशांच्या परदेशी शिष्टमंडळाकडून कौतुक

भारतासारख्या लोकशाही देशात निवडणूक प्रक्रिया ही खूप महत्त्वपूर्ण बाब आहे. येथील मतदारांचा स्वयंप्रेरीत मतदानासाठीचा उत्साह …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *