भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांचे ड्रग्ज व्यापारातील गुन्हेगारांशी संबध असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांनी केला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याची बहिण असलेल्या हसिना पारकर हिच्या माध्यमातून नवाब मलिक यांनी कुर्ला येथील गोववाला कंपाऊड येथील मालमत्ता स्वस्तात खरेदी केल्याचा आणि या मालमत्ता खरेदीतील पैसा देशविरोधी कारवायासाठी वापरल्याचा आरोप करत नवाब मलिक यांच्या त्या जमिनीची खरेदी-विक्रीची कागदपत्रे ईडीकडे देवेंद्र फडणवीस सादर केली. त्यानंतर नवाब मलिक यांना अटक करण्यात आली. त्यानंतर जवळपास १ वर्ष ५ महिन्यानंतर माजी मंत्री नवाब मलिक यांना त्यांच्या वैद्यकिय कारणासाठी दोन महिन्याचा जामीनाचा अर्ज सर्वोच्च न्यायालयाने आज मंजूर केला. विशेष म्हणजे ईडीच्या अधिकाऱ्यांनी जामीन देण्यास कोणत्याही स्वरूपाचा विरोध केला नसल्याची माहिती पुढे येत आहे. तसेच नवाब मलिक यांना प्रकृतीच्या कारणास्तव पुढील २ महिन्यांसाठी मलिकांना जामीन मिळाला आहे.
नवाब मलिक मूत्रपिंडाच्या उपचारांसाठी कुर्ला येथील खासगी रुग्णालयात दाखल आहेत. वैद्यकीय कारणास्तव जामीन देण्यास विशेष न्यायालयाने नकार दिल्यानंतर मलिक यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्या एकलपीठाने मलिक यांच्या याचिकेवर निर्णय देताना त्यांना वैद्यकीय कारणास्तव जामीन देण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. अखेर सर्वोच्च न्यायालयाने मलिक यांना जामीन मंजूर केला.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यावेळी अल्पसंख्याक आणि कौशल्य विकास मंत्रिपद सांभाळणाऱ्या नवाब मलिक यांना ईडीने अर्थात सक्तवसुली संचालनालयने २३ फेब्रुवारी २०२२ रोजी अटक केली होती. ईडीने नवाब मलिक यांच्या एकूण आठ मालमत्तांवर टाच आणली आहे. यामध्ये नवाब मलिक यांची कुर्ल्यातील गोवावाल कंपाऊंड येथील मालमत्ता, धाराशिव येथील १४७ एकरांची जमीन, मुंबईतील ३ सदनिका आणि दोन राहत्या घरांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यात नवाब मलिक यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. लँड डीलशी संबंधित हे प्रकरण असून टेरर फंडिंग आणि मनी लाँड्रिंगचा आरोप मलिक यांच्यावर करण्यात आला होता.
‘कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या टोळीतील सदस्यांसोबत नवाब मलिक यांनी संगनमत करून कुर्लामधील मुनिरा प्लंबर या महिलेची गोवावाला कंपाऊंड ही जमीन हडप केली. त्याच कटांतर्गत दाऊद टोळीच्या सदस्यांनी मुनिरा यांना फसवून कुलमुखत्यारपत्र तयार करून घेतले आणि अवैधरित्या जमीन ताब्यात घेऊन जमिनीच्या मोबदल्याचे पैसे अन्यत्र वळवले, या आरोपाखाली ईडीने गुन्हा नोंदवला होता.
दरम्यान, ड्रग्ज व्यापारातील दोन गुन्हेगारांकडून देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी गायलेल्याल्या मुंबईतील मीठी नदी बचाव आणि पर्यावरणविषयक गाण्याच्या रेकॉर्डिंगचा आणि शुटींगचा खर्च करण्यात आल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. तसेच या दोन्ही गुन्हेगारांचे फडणवीस यांच्याशी घरी जाणे-येणे असल्याचे फोटोग्राफही नवाब मलिक यांनी जाहिर केले होते.
दरम्यान, अजित पवार यांनी भाजपाशी संगत केल्यानेच आणि नवाब मलिक यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिल्याने ईडीनेही नवाब मलिक यांच्या जामीनाला कोणताही विरोध केला नसल्याचे सांगण्यात येत आहे.