Breaking News

विजयानंतर ऋतुजा लटकेंची पहिली प्रतिक्रिया: नोटाची मते भाजपाचीच…

शिवसेनेचे आमदार स्व. रमेश लटके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूकीचा निकाल आज जाहीर झाला. या निवडणूकीत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांचा ६५ हजार मतांनी दणदणीत विजय झाला. मात्र या निवडणूकीत नोटाखाली मोठ्या प्रमाणावर मते मिळाली. त्यामुळे लटके यांच्यानंतर दोन नंबरची मते नोटाला मिळाली आहेत. या विजयानंतर बोलताना ऋतुजा लटके म्हणाल्या की, उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतरही भाजपाकडून नोटाचा प्रचार करण्यात आला. तीच मते भाजपाला पडली असे स्पष्ट केले.

पुढे बोलताना ऋतुजा लटके म्हणाल्या, सर्वप्रथम मी म्हणेण हा विजय माझा नसून माझे पती रमेश लटके यांचा आहे. त्यांनी त्यांची जी संपूर्ण राजकीय कारकीर्द होती त्यामध्ये जी जनसेवा केली, विकासकामे केली. त्याची पोचपावती ही विजयाने मिळालेली आहे. मतदारांनी त्याची एक परतफेड ही केलेली आहे.

तर या निवडणुकीत नोटांचा जास्त प्रचार झाल्याच्या मुद्य्यावर बोलताना ऋतुजा लटके म्हणाल्या, नोटाचा प्रचार हा म्हणजे त्यांनी(भाजपाने) जरी उमेदवारी मागे घेतली होती, तरी लोकांना सांगण्यात आलं आणि आपल्याकडे व्हिडिओ क्लिपही आल्या आहेत की तुम्ही नोटाला मतदान करा. नोटाचा असा प्रचार होत नसतो. नोटा म्हणजे तुम्हाला कुठलाही पक्ष मान्य नाही, तेव्हा तुम्ही नोटाचं बटण दाबू शकता. त्यामुळे ही पूर्णपणे जबाबदारी मतदारांची होती आणि हा प्रश्न मतदारांना विचारला पाहिजे की, त्यांनी नोटावर का मतदान केलं?

भविष्यात कुठल्या कामांना प्राधान्य असणार? यावर उत्तर देताना ऋतुजा लटके म्हणाल्या, पहिलं काम माझं हेच असणार आहे की, रमेश लटके यांची जी कामे अर्धवट राहिली आहेत, ती कामे पूर्ण करण्यास माझी प्राथमिकता असणार आहे. याशिवाय त्यांचा जो अंधेरीचा जास्तीत जास्त विकासाचा ध्यास होता, त्यानुसार काम करणार आहे. मी सर्व जनतेचे आभार मानते. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात याशिवाय या पूर्ण निवडणुकीची जबाबदारी घेणारे अनिल परब या सर्वांचे मी मनापासून आभार मानते.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या गुंदवली मनपा शाळेमध्ये आज सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीस सुरुवात झाली आहे. या मतमोजणीसाठी २०० अधिकारी व कर्मचारी कार्यरत होते. यामध्ये मुंबई उपनगर जिल्हा प्रशासन, राज्य शासनाची विविध खाती, बृहन्मुंबई महानगरपालिका, म्हाडा, महावितरण, प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई मेट्रो, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यासारख्या विविध संस्थांच्या अखत्यारीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

 

Check Also

चला.. लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊ या, मतदानासाठी या आहेत सुविधा ….

लोकसभा निवडणूक २०२४ साठी पाचव्या टप्प्यात २० मे रोजी मुंबई उपनगर जिल्ह्यातील चार मतदारसंघात मतदान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *