Breaking News

अखेर अनिल देशमुख तुरुंगाबाहेर पण मुंबईबाहेर जाण्यास बंदी न्यायालयाच्या अटीनुसार अधिवेशन आणि घरी जाण्यास मनाई

जवळपास मागील वर्षभरापासून मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या १०० कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणी तुरुंगात असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या जामीनामुळे अखेर तब्बल १ वर्ष, १ महिना आणि २७ दिवसांनी तुरुंगातून सुटका झाली.

परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपामुळे याप्रकरणी ईडी आणि सीबीआयने देशमुख यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले. मागील अनेक दिवसांपासून त्यांच्याकडून जामिनासाठी प्रयत्न सुरू होता. त्यांना आधी ईडी प्रकरणात आणि नंतर सीबीआय प्रकरणात जामीन मंजूर झाला. मात्र, सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी वेळ मागितल्याने त्यांचा तुरुंगातील मुक्काम वाढला होता. अखेर आज अनिल देशमुख तुरुंगाबाहेर आले.

सीबीआय प्रकरणात एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठाने अनिल देशमुखांना जामीन मंजूर केला. या प्रकरणात १०० कोटी वसुलीचे खोटे आरोप देशमुखांवर केल्याचा युक्तीवाद देशमुख यांच्या वकिलांनी केला होता. या प्रकरणामध्ये कुठलाही पुरावा नसताना आरोप करण्यात आले. या प्रकरणात २०२१ मध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर एप्रिल २०२२ मध्ये बेकायदेशीरपणे अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली. परमबीर सिंग आणि सचिन वाझे यांनी देशमुख यांना अडकवण्याचा प्रयत्न केला, असा युक्तीवाद देशमुख यांचे वकील विक्रम चौधरी यांनी न्यायालया समोर केला.

अनिल देशमुख यांच्यावर गृहमंत्री असताना पदाचा गैरवापर करून बेकायदेशीर कथित आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला होता. १०० कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणामध्ये जून महिन्यात सीबीआयने अनिल देशमुख यांच्याबरोबरच त्यांचे स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे, संदीप पलांडे यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केलं होते.

न्यायालयाने अनिल देशमुख यांना मुंबईबाहेर जाण्यास मज्जाव केला आहे. त्यामुळे देशमुख हे नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात भाग घेऊ शकणार नाहीत. तसेच नागपूर येथील निवासस्थानीही जाता येणार नाही.

दरम्यान अनिल देशमुख तुरुंगातून बाहेर येताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्याचे जल्लोषात स्वागत केले.

Check Also

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील अपघातातील मृतांना ५ लाखांची मदत जखमींवर मोफत उपचार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

डोंबिवली (घेसरगाव) येथून खासगी बसने पंढरपूर येथे निघालेल्या वारकरी भक्तांच्या वाहनाला मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *