अंतर्गत मतभेदामुळे सध्या एकल कुटुंब पद्धत वाढल्याने जनरेशन गॅप वाढत आहे. परंतु मुलांची जडण- घडण, त्यांच्यावर संस्कार होण्यास एकत्रित कुटुंब पद्धत गरजेची असल्याचे प्रतिपादन कोकण विभाग म्हादे परिवार संलग्न कोकणस्थ म्हादे प्रतिष्ठाणचे अध्यक्ष प्रदिप म्हादे यांनी केले. रविवारी संस्थेचा पाचवा वर्धापन दिन आणि स्नेह मेळावा दिवा येथील शिवलिला अपार्टमेंट मोठ्या उत्साहात, जल्लोषात आणि आनंदात साजरा झाला. दरम्यान, शालेय मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
विस्थापित बंधुंना सोशल माध्यमातून एकत्र आणण्यासाठी पुढाकार घेतला. पाच वर्षांत आजवर सुमारे ४० गावात म्हादे, महादे, म्हादये, म्हांदे अशी आडनावे असलेली मोठी वाडीवस्ती आहे. या परिवाराचा विस्तार, उत्कर्ष आणि विकासासाठी संस्थेच्या माध्यमातून विविध गावांच्या गाठीभेटी घेऊन शैक्षणिक, सामाजिक उपक्रम राबवले जातात. यंदा पाचव्या वर्धापन दिनानिमित्ताने आमदार राजू पाटील यांच्या सहकार्य आणि संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्य वाटप, महिलांसाठी हळदीकुंकू आणि स्नेह संमेलन मेळावा मोठ्या आनंदात पार पडला. प्रदिप म्हादे यांच्या अध्यक्षतेखाली तीन वर्षांसाठी नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
मुंबईसह शहरी भागात धकाधकीच्या जिवनात अनेकजण घराबाहेर राहतात. अशातच, एकल कुटुंब पध्दत वाढीस लागली आहे. ग्रामिण भागापर्यंत हे फॅड पोहचले आहे. काही कारणे अपवाद असली तरी त्याचे वैयक्तिक दुष्परिणाम ही वाढली आहेत. त्यामुळे घराला घरपण, मुलांची जडण – घडण, त्यांच्यावरील संस्कारासाठी एकल नव्हे एकत्रित कुटुंब पद्धत असणे गरजेचे आहे, असे मत अध्यक्ष प्रदिप म्हादे यांनी व्यक्त केले. शेती आणि त्याची उपयुक्तता याबाबत खजिनदार संजय म्हादये यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. म्हादे परिवाराच्या विस्ताराबाबातचे प्रास्ताविक संस्थापक तथा संघटन प्रमुख विलास म्हादे, संदीप म्हादे यांनी केले. मुख्य लेखापाल तथा हिशोब तपासणी रविंद्र म्हादे आणि सरचिटणीस दीपक म्हादये यांनी सूत्रसंचालन केले.