Breaking News

अभिनेता गोविंदा आहुजा शिवसेना शिंदे गटात

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून राम नाईक यांचा पराभव करून काँग्रेसचा खासदार म्हणून निवडून आलेले चित्रपट अभिनेता गोविदा आहुजा यांनी १४ वर्षांच्या राजकीय वनवासानंतर शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. गोविंदा यांना पुन्हा लोकसभेच्या मैदानात उतरवले जाईल की त्यांना स्टार प्रचारक म्हणून जबाबदारी केली जाईल याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.

उत्तर-पश्चिम लोकसभा हा शिवसेनेचा मतदारसंघ आहे. मात्र हा मतदारसंघ आता शिवसेना ठाकरे गटाचा की शिंदे गटाचा यावर या लोकसभा निवडणुकीत शिक्कामोर्तब होणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. टप्प्याटप्प्यात उमेदवारांच्या याद्या जाहीर होत असतानाच स्टार प्रचारकांच्याही याद्या जाहीर केल्या जात आहेत. अशातच खासदार, आमदारांसह नेतमंडळी विविध पक्षात पक्षप्रवेश करत आहेत. बॉलिवूड अभिनेता गोविंदा आहुजा यांनीही आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

उत्तर-पश्चिम मुंबई मतदार संघात शिवसेना ठाकरे गटातर्फे खासदार गजानन कीर्तिकर यांचे पुत्र अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अमोल कीर्तिकर यांच्या उमेदवारीबाबत माजी खासदार काँग्रेसचे संजय निरुपम यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. अमोल कीर्तिकर यांना खिचडीचोर म्हणत खिचडीचोराचा प्रचार आपण करणार नाही, असे म्हणत त्यांनी त्या मतदारसंघावर आपला दावा सांगितला आहे. २०१९ च्या निवडणुकीत आपला गजानन कीर्तिकर यांच्याकडून पराभव झाला असला तरी आपण त्या मतदारसंघात काम करणे थांबवलेेले नाही. अजूनही आपला मतदार संघात जनसंपर्क आहे. त्यामुळे आपण तेथून इच्छुक असल्याचे निरुपम यांनी म्हटले आहे. महाविकास आघाडीतील ठाकरे गट-काँग्रेसच्या वादाचा फायदा घेण्यासाठी शिंदे गट गोविंदाला उभे करण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.

सन २००४ मध्ये भाजपच्या राम नाईक यांचा पराभव करत गोविंदा काँग्रेसचे खासदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर ते १४ वर्षे राजकारणापासून लांब राहिले. मात्र ठाकरे गट आणि काँग्रेसच्या वादात संधी साधत पुन्हा खासदार होण्याची नामी संधी म्हणून गोविंदा यांना पाचारण करण्यात आले असावे, असा अंदाज बांधला जात आहे. जर गोविंदा यांना उमेदवारी देण्यात आली नाही तर त्यांना स्टार प्रचारक म्हणूनही नियुक्त केले जाण्याची शक्यता आहे. महायुतीची स्टार प्रचारकांची यादी नुकतीच जाहीर झाली आहे. त्यात बॉलिवूडचा तारा म्हणून मतदारांची मने वळविण्यासाठी गोविंदा यांचाही स्टार प्रचारक म्हणून समावेश होऊ शकतो.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अभिनेता गोविंदा अहुजा यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या पक्षप्रवेशानंतर अभिनेता गोविंदा अहुजा यांनी माध्यमांशी संवाद साधला. देवाची कृपा म्हणून शिवजयंतीनिमित्त मला शिवसेनेत प्रवेश मिळाला. मी साल २००४ ते २००९ या कालावधीत राजकारणात होतो. त्यानंतर राजकारणातून बाहेर पडल्यानंतर पुन्हा राजकारणात दिसेन याबाबत साशंक होतो. पण २०१० ते २०२४ या १४ वर्षांच्या वनवासानंतर ज्या पक्षात रामराज्य आहे, त्याच पक्षातून माझी राजकीय वाटचाल पुन्हा सुरू करत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मी शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री शिंदे मला जे काम देतील ते मी योग्यरित्या पार करीन. विशेषत: मला कला आणि सांस्कृतिक क्षेत्रात काम करायाल आवडेल. कारण विरारपासून बाहेर पडल्यानंतर माझे जगात नाव झाले आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे”, असेही गोविंदा म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे यांची कृपा

फिल्मसिटी मॉर्डन आहेच. मुंबई आधीपेक्षा जास्त सुंदर दिसतेय. विकास दिसतोय. एकनाथ शिंदे आल्यापासून मुंबईत विकास दिसतोय. रस्ते असो, सुशोभीकरण असो, कामांना सुरुवात झालीय. माझ्यावर बाळासाहेब ठाकरे यांची कृपा राहिली आहे, असे गोविंदा म्हणाले. एकनाथ शिंदे यांचं व्यक्तिमत्व मला आवडले. त्यामुळे मी एकनाथ शिंदे यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतला, असे गोविंदा म्हणाले.

कोणतीही अट न ठेवता शिवसेना प्रवेश

गोविंदा आपल्यासोबत कोणतीही अट न ठेवता शिवसेनेत आले. चित्रपटसृष्टी आणि सरकार यांच्यातील गोविंदा दुवा आहेत. गोविंदा आता शिवसेनेचे स्टार प्रचारक राहतील, असे एकनाथ शिंदे म्हणाले. आमच्या सरकारच्या कामांनी प्रभावित होऊन गोविंदा शिवसेनेत सहभागी झाले, असे एकनाथ शिंदे म्हणाले. चित्रपटसृष्टी आणि कलाकारांसाठी काम करताना सरकार म्हणून आम्ही निश्चितच त्यांच्या पाठिमागे उभे राहू, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

Check Also

दृष्टिबाधित व्यक्तींसाठी समावेशक ॲटलासचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

दिव्यांग व्यक्तींना देशाच्या सामाजिक, आर्थिक प्रगतीमध्ये योगदान देण्यासाठी सक्षम करणे आवश्यक आहे. दिव्यांगांना शिकविण्यात येणारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *