Breaking News

कर्करोगावर सातत्याने नवे संशोधन होत राहणे गरजेचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांची सूचना

मुंबई : प्रतिनिधी

वैद्यकशास्त्रात पदवी घेतलेल्या संशोधकांनी कर्करोग क्षेत्रात सातत्याने संशोधन करीत राहणे आवश्यक आहे. मात्र या अनुषंगाने प्राचीन आयुर्वेदामधून काही पर्यायी उपाय मिळू शकतात का यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त करत कर्करोगावर स्वदेशी आणि परवडणारे उपायांच्या अनुषंगाने संशोधन करावे अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.

होमी भाभा नॅशनल इन्स्टीट्यूट या अभिमत विद्यापीठांतर्गत टाटा मेमोरियल सेंटर येथून कर्करोगावर संशोधन करणा-या विविध विद्यार्थ्यांना यावेळी पदवीदान करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्यपाल चे. विद्यासागर राव, उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे, अणु उर्जा आयोगाचे अध्यक्ष आणि भारत सरकारचे सचिव डॉ. शेखर बासू, होमी भाभा नॅशनल इन्स्टीट्यूटचे कुलगुरु पी. आर वासूदेव राव आदी उपस्थित होते. यावेळी सन २०१७-१८ या बॅच मधील पदवीधारकांना उपराष्ट्रपती आणि राज्यपालांच्या हस्ते पदवीदान करण्यात आले.

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) ने २०१६ मध्ये केलेल्या अनुमानानुसार, २०२० पर्यंत नवीन रुग्णांची संख्या १७.३ लाखांवर जाण्याची शक्यता आहे. तर २०२० पर्यंत कर्करोगाने होणा-या मृत्यूंची संख्या ८.८ लाख पर्यंत पोहचण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. आजही केवळ १२.५ टक्के रुग्ण हे रोगाच्या प्रारंभिक अवस्थेत उपचार घेण्यासाठी येतात असे उपलब्ध माहीतीवरून लक्षात येते. भारतात स्त्रियांमध्ये स्तनाचा कर्करोग सर्वात जास्त होतो. तर पुरुषांमध्ये तोंडावाटेचे कर्करोग जास्त झालेले आढळतात. याचे कारण बदलती जीवनशैली, आहाराच्या चुकीच्या सवयी, तंबाखू, सुपारी आणि अल्कोहोलसारख्या पदार्थांचे वाढते व्यसन याला कारणीभूत असल्याचे ते म्हणाले.

टाटा मेमोरियल हॉस्पिटलने “नॅव्हिगेशन प्रोग्राम फॉर पेशंट केअर – के वॅट” नावाने सुरु केलेला हा  उपक्रम अत्यंत स्त्युत्य आहे. देशात  पहिल्यांदाच असा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस आणि टाटा ट्रस्टच्या सहकार्याने, एक वर्ष (संपूर्ण वेळ) रुग्ण नेव्हिगेशन संदर्भात प्रशिक्षण (केईव्हीएटी) देण्यात येणार आहे. बरेचदा रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना निदान समजत नाही. विविध उपचारांच्या पर्यायांची आणि उपलब्ध संसाधनांची जाणीव नसते. के वॅटमुळे रुग्णांच्या नातेवाईकांना आणि रुग्णाला योग्य मार्गदर्शन करण्यासाठी प्रशिक्षीत मनुष्यबळ तयार होणार आहे.

Check Also

Corona JN-1 टास्क फोर्सच्या बैठकीत घेतले “हे” निर्णय

राज्यात कोरोनाच्या ‘जेएन-1’ या नवीन व्हेरियंटचे रुग्ण आढळत असल्याने ‘कोरोना टास्क फोर्स’’ स्थापन करण्यात आले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *