Breaking News

१५ मे पासून साथरोग नियंत्रण कक्ष सुरू करणार साथीच्या रोगावर विभागाने विशेष लक्ष देण्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांचे निर्देश

मुंबई : प्रतिनिधी

पावसाळ्यात होणाऱ्या साथीच्या रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य यंत्रणेने आतापासून तयारी सुरू करावी. तसेच विभागाने निम्नशहरी भागात विशेष लक्ष द्यावे, असे निर्देश आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी यावेळी दिले. १५ मे पासून साथरोग नियंत्रण कक्ष सुरू करण्याच्या सूचनाही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. स्वाईन फ्ल्यू प्रयोग शाळा नाशिकमध्ये जिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणी तातडीने उभारण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

महाराष्ट्र साथरोग नियंत्रण समितीची बैठक आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झाली. यावेळी समितीचे अध्यक्ष डॉ. सुभाष साळुंके, नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे, आरोग्य सेवेचे संचालक डॉ. संजीव कांबळे, सहसंचालक डॉ. एम.एम. डिग्गीकर यांच्यासह जागतिक आरोग्य संघटना, राष्ट्रीय विषाणू संस्था, इंडियन मेडिकल असोसिएशन आदी विविध संस्थांचे प्रतिनिधी तसेच विविध महानगरपालिकांचे आरोग्य अधिकारी उपस्थित होते. त्यावेळी पावसाळ्यात होणाऱ्या साथीच्या रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेतला.

आरोग्यमंत्री यावेळी म्हणाले की, सर्व आरोग्य यंत्रणांनी समन्वय राखल्यामुळे गेल्या तीन वर्षात साथीच्या रोगावर नियंत्रण मिळविण्यात आले आहे. यापुढील काळातही स्वाईन फ्लू, लेप्टोस्पायरोसीस, डेंगी, क्यासनूर फॉरेस्ट डिसिज (माकडताप), चिकनगुन्या, आदी साथीच्या रोगांवर नियंत्रणासाठी राज्याचा आरोग्य विभाग, जिल्हा परिषद व महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने सतर्क रहावे. ग्रामीण व शहरी भागाबरोबरच निम्नशहरी भागावर देखील प्राधान्याने लक्ष द्यावे. साथीचे रोग पसरणाऱ्या ठिकाणांवर सातत्याने बारकाईने लक्ष द्यावे.

राज्यातील प्रत्येक आरोग्य मंडळात वैद्यकीय महाविद्यालयाच्या ठिकाणी स्वाईन फ्ल्यू प्रयोग शाळा उभारावी तसेच नाशिकमध्ये जिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणी ही प्रयोगशाळा तातडीने उभारावी. साथीच्या रोगासंबंधी घ्यावयाची काळजी, निदान यासंबंधी जनजागृती करण्याच्या सूचनाही डॉ. सावंत यांनी यावेळी दिल्या.

Check Also

Corona जे एन- १ ला घाबरू नका, सतर्क रहा

राज्यात कोरोनाच्या Corona ‘जेएन-१’ या नवीन व्हेरियंटचे रुग्ण आढळले असले, तरी नागरिकांनी घाबरून न जाता …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *