Breaking News

संरक्षण उत्पादन क्षेत्रातील गुंतवणूकीसाठी ब्रिटीश कंपनी उत्सुक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी

केंद्र सरकारने संरक्षण क्षेत्रात परकीय गुंतवणूकीला १०० टक्के परवानगी दिल्याने महाराष्ट्रात  संरक्षणविषयक उत्पादनांची निर्मिती क्षेत्रात गुंतवणूक करण्याची तयारी ब्रिटीश कंपनी बीएई सिस्टीम्सने अनुकुलता दर्शविली आहे. तसेच यासाठी लागणारे आवश्यक ते मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी प्रशिक्षण देण्यासाठी ट्रेनर हॉकची निर्मिती करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीएई सिस्टीम्सचे अध्यक्ष रॉजर कार यांच्यासोबत दावोस येथे झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर दिली.

दावोस येथील वर्ल्‍ड इकॉनॉमिक फोरमच्या ४८ व्या वार्षिक परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्राचे शिष्टमंडळ जागतिक पातळीवरील विविध प्रतिष्ठित आर्थिक-औद्योगिक संस्थांशी संवाद साधत आहे. या परिषदेच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र पॅव्हेलियनमध्ये बीएई सिस्टीम्सचे अध्यक्ष कार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली.

बीएई सिस्टीम्स ही संरक्षण, सुरक्षा आणि एरोस्पेस क्षेत्रातील बहुराष्ट्रीय ब्रिटीश कंपनी आहे. या कंपनीने महाराष्ट्रात संरक्षण उत्पादनाला चालना देण्यासाठी गुंतवणूक करण्यास उत्सुकता दाखविली आहे. त्यासाठी राज्य सरकार त्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा देणार आहे. पुढच्या महिन्यात मुंबई येथे होणाऱ्या मॅग्नेटिक महाराष्ट्र या जागतिक उद्योग परिषदेत सहभागी होण्याचे निमंत्रणसुद्धा कंपनीने स्वीकारले असून भारतीय कंपन्यांसोबत संरक्षण उत्पादन क्षेत्रात अधिक काम करण्याची तयारी देखील दर्शविल्याचे त्यांनी सांगितले.

जागतिक बॅंकेच्या फूड अँड ॲग्रिकल्चर ग्लोबल प्रॅक्टिस विभागाचे वरिष्ठ संचालक जॉर्जेन व्योगेल यांनीही दावोस येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी जागतिक बँकेच्या मदतीने राज्य सरकार राबविणार असलेल्या हवामानपूरक शेतीचा प्रकल्प अर्थात नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजनेबाबत अतिशय चांगली चर्चा झाली. या प्रकल्पासाठीच्या बहुतेक बाबींची पूर्तता केंद्र सरकारकडे करण्यात आली असल्याने जागतिक बँक लवकरच त्यावर निर्णय घेणार आहे, अशी माहिती व्योगेल यांनी दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

दरम्यान, केंद्रीय रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी या परिषदेतील महाराष्ट्र पॅव्हेलियनला भेट देऊन राज्यातील गुंतवणुकींच्या संधींबाबत चर्चा केली. तसेच केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेत चर्चा केली.

 

Check Also

जिओचा नवा मनोरंजन प्लॅन अवघ्या ८८८ रूपयात या ओटीटी प्लॅनचे आनंद लुटता घेता येणार

जिओने अलीकडेच एक आकर्षक पोस्टपेड प्लॅन लाँच केला आहे ज्यात उत्साही स्ट्रीमर्सना लक्ष्य केले आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *