Breaking News

शिवसेना बदलतेय…? राष्ट्रीय कार्यकारणीचे आयोजन आणि माध्यमांना खुला प्रवेश

मुंबई: प्रतिनिधी

राज्याच्या राजकारणात नेहमीच कुतुहल शिवसेनेबाबत आहेत. शिवसेनेचा दसरा मेळावा सोडला तर आतापर्यत एकाही पक्ष संघटनेच्या कार्यक्रमात प्रसारमाध्यमांना खुले आमंत्रण नव्हते. मात्र यावेळी राष्ट्रीय कार्यकारणीच्या कार्यक्रमात पहिल्यांदाच प्रसार माध्यमांना खुला प्रवेश देत शिवसेनेत सारे काही (आर) पारदर्शक असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न झाल्याने शिवसेना बदलतेय का? असा प्रश्न शिवसैनिकांबरोबर सर्वसामान्यांच्या मनात निर्माण होताना दिसत आहे.

शिवसेनेच्या इतिहासात आतापर्यत बैठकीत कोणते ठराव मांडले जात आहेत, कोणता निर्णय घेतला जात आहे? याविषयी नेहमी एकतर शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे हे स्वत: सांगायचे किंवा सद्यपरिस्थितीत स्वत: पक्षप्रमुख उध्दव ठाकरे सांगतात. अपवादात्मक स्थितीत पक्षाचा नेता त्याबाबत बोलतो. मात्र पक्षाच्या बैठकीत पहिल्यांदाच तेही राष्ट्रीय कार्यकारणीच्या सभेत थेट प्रसारमाध्यमांना प्रवेश देण्याची शिवसेनेच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ असल्याचे शिवसेनेच्या एका विभाग प्रमुखाने सांगितले.

राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह इतर लहान-मोठ्या पक्षांकडून त्यांच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या सभेत कधीच काळवेळ पाहून प्रसारमाध्यमांना प्रवेश देत आले आहेत. मात्र भाजपने पक्षाच्या कोणत्याही बैठकीला प्रसारमाध्यमांना प्रवेश देण्याऐवजी थेट बंदी घालण्यास सुरुवात केल्याने भाजपमध्ये नेमके काय चाललयं याचीच चर्चा हल्ली जास्त होताना दिसत आहे. तसेच पक्षाच्या बैठकीत धोरणात्मक गोष्टींवर चर्चा झालेली असताना त्यापैकी कोणती गोष्ट उघड करायची आणि कोणती नाही याची खूणगाठ बांधून त्यानंतर संबधित पक्षाच्या नेत्यांकडून पक्षाची अधिकृत भूमिका जाहीर केली जाते. परंतु शिवसेनेने निवडणूकीची प्रक्रिया वगळता इतर सर्वच गोष्टी प्रसारमाध्यमांसमोर केल्याने शिवसेनेला नेमके काय साध्य करायचेय याचा थांगपत्ता लागेनासा झाल्याचे मत भाजपच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने मराठी e-बातम्याशी बोलताना व्यक्त केले.

शिवसेनेत झालेला हा बदल राज्यातील जनतेला कितपत मानवेल हे आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणूकीत कळेल. मात्र एकदम १८० अंशात झालेला बदल जून्या शिवसैनिकांना तरी पचेल का? याबाबत शंका असल्याची प्रतिक्रिया राज्य सरकारमधील शिवसेनेच्या एका राज्यमंत्र्याने व्यक्त केली.

Check Also

राजकीय पक्ष व उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे

राजकीय पक्षांनी सार्वत्रिक लोकसभा निवडणूक, २०२४ च्या कालावधीमध्ये आदर्श आचारसंहितेचे पालन करणे आवश्यक आहे.निवडणूक काळामध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *