Breaking News

भाजपाने सीबीआयला सर्वे एजन्सी बनवलेय का? काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा सवाल

मुंबईः प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीने सीबीआय सारख्या महत्वाच्या स्वायत्त संस्थेला निवडणुकीतील ओपीनियन पोल सारखे सर्वे करण्याची एजन्सी बनवली आहे का ? असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे.
जालना लोकसभा मतदारसंघातून आपण दोन लाख साठ हजारांच्या मताधिक्क्याने विजयी होऊ असा सीबीआयचा अहवाल आपल्याकडे असल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला आहे. तसा व्हिडिओही व्हायरल झाला आहे, त्यावर ते बोलत होते.
नरेंद्र मोदी सरकारने सीबीआयसारख्या यंत्रणांमध्ये अवाजवी हस्तक्षेप व दबाव आणल्याचे प्रकार पाच वर्षात पहायला मिळाले. मध्यरात्रीच सीबीआयच्या मुख्यालयात दिल्ली पोलिसांचा छापा टाकून सीबीआय प्रमुखांचे कार्यालय सील करणे आणि रात्रीच नव्या सीबीआय प्रमुखांची नियुक्ती करणे असे प्रकार आपण मोदी सरकाराच्याच काळात पाहिले. एवढ्यावरच हे थांबले नसून आता थेट सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांसाठी निवडणूक सर्वे करण्याचे कामही सीबीआयला दिले असे मान्य केले तर ते धोकादायक असल्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली.
सीबीआयकडे अनेक महत्वाची कामं असून त्यांना अशा प्रकारच्या राजकीय सर्वेसाठी जुंपणे खेदजनक आहे. रावसाहेब दानवे यांनी केलेला सीबीआयच्या अहवालाचा दावा खरा आहे का, याचे उत्तर भारतीय जनता पक्षाने द्यावे, अशी मागणी ही त्यांनी केली.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या चार टप्प्यात ६६.९५ टक्के मतदान

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या चार टप्प्यात एकूण मतदान ६६.९५% इतके नोंदवले गेले आहे, निवडणूक आयोगाने गुरुवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *