Breaking News

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. पराभवाच्या भितीने ते सैरभैर झाले असून काँग्रेस व इंडिया आघाडीवर खालच्या पातळीवर येऊन टीका करत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाजपाच्या मेहरबानीवर बसवलेले मुख्यमंत्री आहेत. भाजपा जेवढी चावी देती ते तेवढेच बोलू शकतात परंतु काँग्रेस पक्ष व राहुल गांधी यांच्याबद्दल बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी मर्यादा सोडू नये. गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही. राहुलजींवर टीका केल्याने एकनाथ शिंदेंच्या कपाळावरचा गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही, असे सडेतोड उत्तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.

राहुल गांधी यांच्या वरील एकनाथ शिंदे यांच्या विधानाचा समाचार घेताना नाना पटोले पुढे म्हणाले की, राहुल गांधी यांनी पदयात्रा काढून संपूर्ण भारत देश पिंजून काढला आहे. कन्याकुमारी ते काश्मीर ४ हजार किलोमीटरची पदयात्रा काढली. सर्व समाजाच्या लोकांच्या वेदना जाणून घेतल्या, त्यानंतर मणिपूर ते मुंबई ६७०० किमी ची भारत जोडो न्याय यात्रा काढली. राहुल गांधी यांनी ऊन, वारा, पावसाची तमा बाळगली नाही, सतत चालत राहिले ते केवळ देशातील जनतेसाठी, त्यामुळे गरम झाले की राहुल गांधी परदेशात जातात असे बाष्कळ विधान करुन एकनाथ शिंदे यांनी अकलेचे तारे तोडले आहेत. गद्दारी करुन सत्ता मिळवणाऱ्या भाजपच्या मिंध्यांना गांधी कुटुंबाचा त्याग, बलिदान व राहुल गांधी काय कळणार? असा सवालही यावेळी केला.

पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या मदतीने बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडून गद्दारी केली. भाजपाच्या मदतीने सुरत व तेथून गुवाहाटीला जावून महाविकास आघाडीचे सरकार पाडले. ईडी कारवाईच्या भितीने गद्दारी करून पक्ष चोरणाऱ्यांनी काँग्रेस व राहुल गांधी यांच्याबद्दल बोलू नये. भाजपाच्या वळचणीला गेलेल्या एकनाथ शिंदे यांनी काहीही केले तरी त्यांच्या कपाळावरचा गद्दारीचा शिक्का कधीही पुसला जाणार नाही अशी टीकाही यावेळी केली.

नाना पटोले पुढे बोलताना म्हणाले की, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधीवर केलेल्या टिकेचाही पटोले यांनी समाचार घेतला. बावनकुळे यांना त्यांच्या पक्षातच कोणी विचारत नाही. ते दररोज फक्त विरोधी पक्षांच्या नेत्यांवर गरळ ओकत असतात, देंवद्र फडणवीस यांनी त्यांना तेवढेच काम दिलेले आहे. राहुल गांधी यांच्यावर बोलण्याएवढे बावनकुळे यांची उंची नाही. राहुल गांधी यांच्याबद्दल बोलण्याआधी बावनकुळे यांनी त्यांच्या पक्षाचे सर्वोच्च नेते नरेंद्र मोदींनी विरोध पक्षांचे नेते, महिला यांच्याबद्दल कसे बोलावे याचे धडे द्यावेत मग दुसऱ्यांना शिकवावे, असा खोचक सल्लाही यावेळी दिला.

Check Also

नाना पटोले यांची टीका, मुस्लिमांशी नाते घट्ट म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींचे पुन्हा मुस्लीम द्वेषावरच भाषण

मोदी सरकारने कधीच कोणाला धर्म विचारला नाही व धर्माच्या नावावर योजनाही राबवल्या नाहीत. मुस्लीमांशी आपले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *