Breaking News

विजय वडेट्टीवार यांची टीका, विद्यार्थी उपाशी असताना निर्ढावलेली यंत्रणा मात्र तुपाशी सरकारच्या गलथान कारभारामुळे ५० ओबीसी विद्यार्थी अडचणीत

परदेशी शिष्यवृत्तीचे पैसे न दिल्याने ५० ओबीसी विद्यार्थी संकटात आहेत. सरकारचा हा गलथान कारभार पुन्हा समोर आला आहे. सरकारच्या भरोशावर परदेशात गेलेल्या विद्यार्थ्यांनी जेवण, निवास खर्च भागवायचा कसा, हा प्रश्न आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभाग जाहिरातीसाठी कोट्यवधी रुपयांच्या निधीची तरतूद करतो. पण विद्यार्थ्यांना पैसे देत नाही. यासारखे दुर्दैव नाही. आमदारांना, कंपन्यांना खुश करण्यात मग्न असलेल्या सरकारला विद्यार्थ्यांची काळजी नाही, अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी संताप व्यक्त करत तसेच विद्यार्थ्यांचे पैसे तातडीने पाठवून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी सरकारकडे केली.

विजय वडेट्टीवार म्हणाले, परदेशात शिक्षणासाठी गेलेल्या ५० विद्यार्थ्यांना सरकारने संकटात टाकले आहे. शिष्यवृत्तीचे पैसे न दिल्याने विद्यार्थी एक वेळचे जेवण करत आहेत. फी भरली नाही तर वर्गात बसू दिले जाणार नाही, अशी परिस्थिती आहे. जवळचे पैसे संपल्याने विद्यार्थी विवंचनेत आहेत. विद्यार्थी उपाशी असताना सरकारला काळजी नाही. संचालक कार्यालयातून प्रस्ताव प्राप्त झाल्यावर पैसे वितरित करण्यात येतील, असे सांगत मंत्रालयातील अधिकारी जबाबदारी झटकत आहेत. सरकारचा प्रशासनावर वचक राहिला नाही, अशा शब्दात सरकारला फटकारले.

पुढे बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, मंत्रिमंडळात ओबीसी नेते असताना विद्यार्थ्यांवर ही वेळ का येते. ओबीसी नेत्यांनी बघ्याच्या भूमिकेत राहू नये. विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करावा, असे खडे बोल देखील सुनावत विद्यार्थी उपाशी असताना निर्ढावलेली यंत्रणा मात्र तुपाशी असल्याची टीका करत सरकारने विद्यार्थ्यांचे पैसे तातडीने पाठवावेत, अशी मागणी सरकारकडे केली.

Check Also

नाना पटोले यांची टीका, मुस्लिमांशी नाते घट्ट म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींचे पुन्हा मुस्लीम द्वेषावरच भाषण

मोदी सरकारने कधीच कोणाला धर्म विचारला नाही व धर्माच्या नावावर योजनाही राबवल्या नाहीत. मुस्लीमांशी आपले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *