Breaking News

चर्मकार समाजाच्या पाठिशी शासन खंबीरपणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

चर्मकार समाजाच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे असून समाजातील तरूणांना पुढे नेण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी व शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी सर्वतोपरी मदत व प्रशिक्षण राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

चर्मकार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि समाजमेळाव्याच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. तत्पूर्वी कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय रस्ते विकास व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार प्रवीण दटके, आमदार विकास कुंभारे, चर्मकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष भैय्यासाहेब बिघाणे, केंद्रीय राखीव पोलीस दलाचे दीपक गवई, माजी आमदार परिणय फुके, अशोक थोटे, राजेंद्र चौधरी, रोशन माहुरकर, परिणिता फुके आदी मंचावर उपस्थित होते.

चर्मकार समाजातील प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांची संख्या दरवर्षी वाढत आहे. विशेष म्हणजे प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक मुली आहेत, ही आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. महिलाशक्ती ओळखूनच देशाच्या प्रगतीसाठी महिलांना संधी देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लोकसभा आणि विधानसभेत ३३ टक्के आरक्षण देण्याविषयीचे विधेयक आणल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

चर्मकार महामंडळाच्या कर्ज वितरणात सुलभता आणण्यासाठी मुंबई येथे लवकरच बैठक घेवून जामीन देण्याबाबतच्या व इतर अटी-शर्थी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. बारा बलुतेदारमधील चर्मकार समाजाला उद्योग-व्यवसायात नवीन तंत्र, व्यवसायाच्या नवीन संधी, बाजारपेठ आणि कर्जही मिळाले पाहिजे, याकरता प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना सुरू केलेली आहे. समाजात नवीन उद्योजक घडविण्यासाठी या योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या नवीन दालनाचा चर्मकार समाजाने लाभ घ्यावा, असे आवाहन फडणवीस यांनी केले. चर्मकार समाजाकरिता नागपूर येथे समाज भवन निर्माण करण्यासाठी निधीची उपलब्धता करू, असेही ते म्हणाले. याप्रसंगी उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थांचा सत्कार करण्यात आला.

दहावीचे २३० व बारावीचे १३५ असे एकूण ३६५ विद्यार्थ्यांचा चर्मकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात येत असल्याची माहिती प्रास्ताविकेत भैय्यासाहेब बिघाणे यांनी दिली.

Check Also

नाना पटोले यांची टीका, मुस्लिमांशी नाते घट्ट म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींचे पुन्हा मुस्लीम द्वेषावरच भाषण

मोदी सरकारने कधीच कोणाला धर्म विचारला नाही व धर्माच्या नावावर योजनाही राबवल्या नाहीत. मुस्लीमांशी आपले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *