Breaking News

कसबा पेठ निकालावर शरद पवार म्हणाले, रविंद्र धंगेकरांना विश्वास होता, पण मला खात्री नव्हती… खासदार गिरीश बापट आणि मुक्ता टिळक यांचे भाजपासह सर्वपक्षियांशी मैत्रीपूर्ण संबध

कसबा मतदारसंघ आणि चिंचवड मतदारसंघासाठी महाविकास आघाडीकडून आपले उमेदवार उमेदवार उभे केले. या दोन्ही ठिकाणी भाजपाकडून चांगलीच ताकद लावण्यात आली. तर महाविकास आघाडीनेही पूर्ण ताकद लावली. या दोन्ही निकालांवरून सर्वच पक्षांकडून वेगवेगळी मते मांडली जात आहेत. तर कसबा पेठ मतदारसंघातून महाविकास आघाडीचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी शरद पवार यांच्या मोदीबागेतील निवासस्थानी आज सोमवारी जाऊन भेट घेतली. त्यानंतर कसबा पेठ मतदारसंघातील धंगेकरांच्या विजयाच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या निकालाबाबत नेमके भाष्य केले.

शरद पवार म्हणाले, गिरीश बापट यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे भाजपा आणि त्यांच्या परिवाराशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. मात्र, पुण्यातील भाजपा सोडून इतर सर्वांशीही त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. त्यामुळे साहजिकपणे ज्या मतदारसंघात त्यांचे लक्ष केंद्रित होते तो मतदारसंघ हा आपल्याला जड जाईल, असं आम्हाला वाटत होतं. शेवटी शेवटी एक गोष्ट लक्षात आली की, गिरीश बापट यांच्या सल्ल्याने निर्णय घेतले की नाही याबाबत कुजबुज ऐकायला मिळाली. याचा अर्थ गिरीश बापट आणि टिळकांना डावलून काही निर्णय घेतले, तर त्याचे परिणाम होतील, अशी एक चर्चा होती. कदाचित त्याचा फायदा होईल, अशी शंका होती, असं सांगत शरद पवारांनी सूचक वक्तव्य केले.

रविंद्र धंगेकर यांच्याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले, निवडणूक झाल्यावर जी माहिती मिळाली ती म्हणजे ज्या व्यक्तीला लोकांनी निवडून दिलं ती व्यक्ती वर्षोनुवर्षे कशाचीही अपेक्षा न करता लोकांमध्ये काम करणारी होती. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा असा उमेदवार आहे जो कधीच चारचाकी गाडीत बसत नाही. हा दोनचाकी गाडीवर फिरतो. त्यामुळे दोन पाय असणाऱ्या सर्व मतदारांचं लक्ष या उमेदवाराकडे आहे. त्याचा फायदा होईल, असं ऐकायला मिळालं. ते १०० टक्के खरं ठरलं, असंही नमूद केलं.

शरद पवारांनी रवींद्र धंगेकरांच्या विजयावरही भाष्य करताना म्हणाले, कसबा निवडणुकीतील यशाचं सूत्रं काय हे खरंतर रवींद्र धंगेकर यांनीच सांगितलं पाहिजे. धंगेकरांना यश मिळेल, असं सामान्य लोकांकडून ऐकायला मिळत होतं, पण मला स्वतःला खात्री नव्हती. त्याचं मुख्य कारण म्हणजे नारायण, सदाशिव आणि शनिवार पेठ.

याच्या खोलात जायची गरज नाही. परंतु हा भाजपाचा गड आहे, असं अनेक वर्षे बोललं जातं. दुसरी गोष्ट तिथं अनेक वर्षे गिरीश बापटांनी प्रतिनिधित्व केलं होतं. बापट सतत लोकांमध्ये मिसळून राहणारे नेते आहेत, अशी स्पष्टोक्तीही शरद पवारांनी यावेळी दिली.

Check Also

नाना पटोले यांची टीका,… हा तर छत्रपती शिवरायांचा अपमान

हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षाकडून सातत्याने केला जात आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *