Breaking News

त्या डिलीट केलेल्या ट्विटवर जितेंद्र आव्हाडांचे स्पष्टीकरण, जो तुम करते हो… चंद्रशेखर बावनकुळे यांच्या टीकेला दिले प्रत्युत्तर

मागील काही दिवसांपासून आधी छत्रपती शिवाजी महाराजांवरून नंतर आता छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरून भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एका दर्ग्यात जाऊन दर्शन घेतल्याचा फोटो ट्विट करत टीका केली होती. त्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी इतका नीचपणा अशी टीका केल्यानंतर आव्हाड यांनी ते ट्विट डिलीट केले. त्यावर आज त्या डिलीट केलेल्या ट्विटबाबत खुलासा करत भाजपावर खोचक टीका केली.

दोन दिवसांपूर्वी चंद्रशेखर बावनकुळेंचा एक पत्रकार परिषदेतील व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये बावनकुळेंनी ‘औरंगजेबजी’ असा उल्लेख केल्यामुळे वाद निर्माण झाला होता. विरोधकांनी या मुद्द्यावरून भाजपाला घेरायला सुरुवात केली होती. यावर जितेंद्र आव्हाडांनी केलेलं एक ट्वीट चर्चेचा विषय ठरलं होतं. या ट्वीटमध्ये आव्हाड यांनी एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा दिसत आहेत. याच फोटोचा आधार घेत आव्हाड यांनी ‘औरंगजेबजीच्या कबरीवर फुले वाहताना बावनकुळेजी’ असं खोचक ट्वीट केलं होतं.

मात्र, यावर चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टीकरण देताना हा दावा फेटाळून लावला. जितेंद्र आव्हाडांनी औरंगजेबजी यांच्या कबरीवर मी जाऊन दर्शन घेतलं अशी एक पोस्ट केली. जे. पी. नड्डा, मी चंद्रपूरमध्ये पवित्र दर्ग्यावर गेलो. तिथल्या मुस्लीम परिवारांनीही आमच्यासह दर्शन घेतलं. त्यावर जितेंद्र आव्हाडांनी काय ट्वीट केलं? ते भूगोल विसरलेत का? ते म्हणतात औरंगजेबाच्या थडग्याचं दर्शन घेतलं. इतका नीचपणा? असं म्हणत बावनकुळेंनी आव्हाडांना परखड सवाल केला होता.

यानंतर जितेंद्र आव्हाडांनी ते ट्वीट डिलीट केलं. त्यावरून भाजपाकडून खोचक टीका सुरू होताच आव्हाडांनी त्याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. ‘आम्ही दर्ग्यावर गेलो की आम्ही मुसलमान धार्जिणे..मग “जीतुदिन”, “हा हिंदु द्वेष्टा” म्हणायचं. घाणेरडे फोटो, घाणेरड्या पोस्ट टाकायच्या. ‘औरंगजेबजी’वरुन किती धावपळ? आम्ही बोललो असतो तर बाप रे बाप .. मला माहीत आहे ती संतांची मझार आहे .. पण खोटे बोलून कसे खेळ करता येतात हेच दाखवायचे होते’, असं ट्वीट जितेंद्र आव्हाडांनी केलं आहे.

जो तुम करते हो वो हम भी कर सकते हैं… लेकीन हम करते नही है …तुम करो तो रास लीला, हम करे तो कॅरेक्टर ढीला..दो उडतें तीर से इतने घायल, कभी मीलोगे तो हमारे जखमो के अनगीनत निशान देख लेना, अशा प्रकारे शेरच्या माध्यमातून आव्हाडांनी टोला लगावला आहे.

Check Also

नाना पटोले यांची टीका, मुस्लिमांशी नाते घट्ट म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींचे पुन्हा मुस्लीम द्वेषावरच भाषण

मोदी सरकारने कधीच कोणाला धर्म विचारला नाही व धर्माच्या नावावर योजनाही राबवल्या नाहीत. मुस्लीमांशी आपले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *