Breaking News

अध्यक्षांवरील अविश्वास ठरावावरुन सत्ताधारी विरोधक आमने-सामने गोंधळामुळे विधानसभा तीनवेळा तहकूब

मुंबई : प्रतिनिधी

विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात विरोधकांनी आणलेल्या अविश्वास ठरावाऐवजी राज्य सरकारने विश्वासदर्शक ठराव मांडत तो लगबगीने शुक्रवारी मंजूर केला. त्यावरून आज सोमवारी सभागृहाचे कामकाज सुरु होताच सत्ताधारी आणि विरोधक समोरासमोर येत चांगलीच खडाजंगी झाली. त्यामुळे विधानसभेचे कामकाज तीनवेळा तहकूब करावे लागले.

शुक्रवारी सत्ताधाऱ्यांनी जे कामकाज केले ते म्हणजे विधानसभेच्या इतिहासातील कधीही न झालेले असे चुकीचे कामकाज करण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी  केला तर आम्ही केलेले कामकाज हे नियमानुसार आणि प्रथा परंपरेनुसारच केले असल्याचे सांगत आम्हीच बरोबर असल्याचा दावा सत्ताधाऱ्यांनी केला.

विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात आणलेल्या अविश्वास ठरावाची कोणतीही चर्चा न करता सत्ताधाऱ्यांनी विश्वासदर्शक ठराव आणून नियमाची पायमल्ली केली आहे. मुख्यमंत्री हे २००६ चा विलासरावांच्या वेळेसचा दाखला देतात. मात्र, २००६ ला विलासराव देशमुख यांनी त्यांच्या मंत्रीमंडळावरील विश्वासदर्शक ठराव मांडला होता. त्यांनी अध्यक्षांच्या बाजूने ठराव मांडला नव्हता. आता आम्ही अध्यक्षांच्या विरूद्ध ठराव मांडला आहे. त्यामुळे २००६ ची आणि आताची तुलना होऊ शकत नाही असे सांगत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, अजित पवार यांनी या विषयावर सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संसदीय कामकाजमंत्री गिरीष बापट यांनी सभागृहात निवेदन केले ते म्हणाले की, आम्ही जे कामकाज करीत आहोत ते नियमानुसार असून त्यामध्ये कोणतेही चूकीचे काम केलेले नाही. तसेच हा प्रश्न निकाली निघाला आहे.

मुख्यमंत्र्यांनी निवेदन केल्यानंतर विरोधी पक्षांतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी घोषणाबाजी करत गोंधळ घातला. त्यामुळे सुरूवातीला १० मिनिटांसाठी आणि त्यानंतर अर्धा तासासाठी व १५ मिनिटांसाठी तीनवेळा सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले.

 

Check Also

नाना पटोले यांची टीका,… हा तर छत्रपती शिवरायांचा अपमान

हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षाकडून सातत्याने केला जात आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *