Breaking News

संजय राऊत यांचा मुख्यमंत्री शिंदेंना सवाल, कुठे गेला आता तुमचा स्वाभिमान?

तीन-चार दिवसांपूर्वी भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या माफीनाम्यावर टीका केली. राहुल गांधी यांच्या या टीकेवर राज्यात चांगलेच रणकंदन माजले. त्यामुळे राज्यातील राजकिय वातावरण ऐन थंडीतही चांगलेच तापले. त्यातच आता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपाचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने उध्दव ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर बोचरी टीका करत म्हणाले, महाविकास आघाडी सोबत गेलो म्हणून स्वाभिमान दुखावला म्हणून बाहेर पडलात आणि त्याच पक्षाच्या प्रवक्त्याकडून आणि राज्यपाल कोश्यांरीकडून शिवरायांचा अवमान झाल्यानंतरही तुम्ही सत्तेला चिकटून बसलात. कुठे गेला आता तुमचा स्वाभिमान असा खडा सवाल केला.

काल भाजपा प्रवक्ता सुधांशू त्रिवेदी आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवाजी महाराज यांच्याविषयी वक्तव्य केले होते. त्यावर प्रतिक्रिया आज सकाळी संजय राऊत हे प्रसार माध्यामांशी बोलत होते.

यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले, आम्ही महाविकास आघाडीत गेलो, म्हणून महाराष्ट्राचा स्वाभिमान दुखावला आणि म्हणून तुम्ही पक्ष सोडला. इथेतर भाजपाने त्यांच्या राज्यपालाने अधिकृतपणे शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे. शिवाजी महाराजांना माफीवीर म्हटलं आहे, तरीही तुम्ही सत्तेला चिकटून बसलेला आहात. महाराष्ट्र तुमच्या सरकारवर थुंकतो आहे असेही म्हणाले.

तसेच राज्यपालांनी एक वर्षात चारवेळा शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे. ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांचा अपमान केला. तरीही हे सरकार गप्प आहे. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह हे शिवाजी महाराजांना आदर्श मानतात, महाराष्ट्रात येऊन जयजयकार करतात आणि दुसरीकडे त्यांचे राष्ट्रीय प्रवक्ते म्हणतात की शिवाजी महाराजांनी पाचवेळा औरंगजेबाची माफी मागितली. ही भाजपाची अधिकृत भूमिका आहे का? नाहीतर भाजपाने महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे आणि राज्यपालांना तात्काळ इथून हटवलं पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

मला आश्चर्य वाटतंय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्यांनी स्वाभिमानाचा नारा देत शिवसेना तोडली आणि भाजपासोबत सरकार बनवलं. आता त्यांच्या स्वाभिमान कुठे गेला?, भाजपा शिवाजी महाराजांचा उघडपणे अपमान करते आहे, आता तुमचा स्वाभिमान कुठे गेला? तुम्ही राजीनामा द्या. अशा सरकारमध्ये तुम्ही का राहत आहत?, तुम्हाला खरोखरच शिवाजी महाराजांबाबत जरा जरी स्वाभिमान असेल, मग तुम्ही सरकारमध्ये का बसला आहात? असा खोचक सवालही संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदेना केला.

Check Also

नाना पटोले यांची टीका, मुस्लिमांशी नाते घट्ट म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींचे पुन्हा मुस्लीम द्वेषावरच भाषण

मोदी सरकारने कधीच कोणाला धर्म विचारला नाही व धर्माच्या नावावर योजनाही राबवल्या नाहीत. मुस्लीमांशी आपले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *