Breaking News

राष्ट्रध्वजाचा अपमान करणारे राष्ट्रवादी नव्हे, राष्ट्रद्रोहीच ‘राष्ट्रवादी’च्या तिरंगाविरोधी भूमिकेवर भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा हल्लाबोल

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त संपूर्ण देशातील जनता उत्सव साजरा करत असताना या उत्साहात मिठाचा खडा टाकणाऱ्यांचा राष्ट्रद्वेषच यानिमित्ताने देशासमोर आला आहे. ‘हर घर तिरंगा’ हा एका राजकीय पक्षाचा कार्यक्रम नसून देशातील कोट्यवधी लोकांच्या प्रतिसादामुळे हा राष्ट्रभक्तीचा उत्सव ठरला असताना देशाच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या तिरंग्यास फालतूगिरी म्हणणाऱ्या प्रवृत्तींनी आपली राष्ट्रद्रोही मानसिकता उघड केली आहे, अशी टीका प्रदेश भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शुक्रवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ही देशातील प्रत्येक नागरिकासाठी अभिमानाची बाब आहे. संपूर्ण देश हा सोहळा साजरा करण्यासाठी सज्ज झालेला असताना, राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र केवळ राजकीय क्षुद्रपणातून या सोहळ्याच्या विरोधात भूमिका घेतली आहे. राष्ट्रहिताच्या कोणत्याही मोहिमेस नेहमीच खो घालणा-या साडेतीन जिल्ह्यांपुरतेच जेमतेम अस्तित्व असलेल्या या पक्षाचे अध्यक्ष आपल्या पाळीव पोपटांच्या तोंडातून राष्ट्रद्वेषाची गरळ ओकत असतात. या वेळी देशभर उत्साहाने साजरा होत असलेल्या हर घर तिरंगा या राष्ट्रीय उत्सवास फालतूगिरी म्हणत राष्ट्रवादीने आपल्या त्याच प्रवृत्तीचे उघड प्रदर्शन केले आहे. अशा राष्ट्रीय सोहळ्यांना विरोध करण्यामुळे देशातील राष्ट्रविरोधी राजकारणाचे मुखवटे जनतेसमोर आपोआपच उघडे पडले आहेत. अशा मानसिकतेची कीड देशातच फोफावत असल्याने देशाबाहेरील विघातक शक्तींना बळ मिळते, असे ते म्हणाले.

देशद्रोही दहशतवादी दाऊदशी संबंध असलेल्या नवाब मलीकांना अटक होऊनही त्यांचे मंत्रिपद कायम ठेवून त्यांचे समर्थन करणारे, मुंब्रा येथील दहशतवादी इशरत जहांच्या समर्थनासाठी निधी गोळा करून तिला राष्ट्रभक्त ठरविणारे, देशाच्या स्वातंत्र्य सोहळ्यास विरोध करणारे आणि राष्ट्रध्वज उभारण्याच्या मोहिमेस फालतूगिरी मानणारे राष्ट्रवादीचे नेते आणि प्रवक्ते आपल्या देशविरोधी कृतीतून आपल्या अकलेचा बाजार मांडत असून पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मौन पाळून नेहमीच अशा भूमिकेस पाठिंबा दिला आहे, असा आरोपही त्यांनी केला.

मिटकरी, आव्हाड, भुजबळ यांच्यासारख्यांच्या मुखातून शरद पवार हेच बोलत असतात हे आता जनतेने ओळखले असून अशा राष्ट्रद्रोही मानसिकतेला जनमानसात थारा मिळणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. स्वातंत्र्याचा सोहळा साजरा करणे हा प्रत्येक देशवासीयाचा हक्क असताना हर घऱ तिरंगा मोहिमेस फालतूगिरी म्हणून देशाच्या राष्ट्रध्वजाचा अपमान करणाऱ्या मिटकरी यांच्यावर आणि त्या वक्तव्यावर मौन पाळून त्याला संमती देणाऱ्या नेत्यांवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या चार टप्प्यात ६६.९५ टक्के मतदान

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या चार टप्प्यात एकूण मतदान ६६.९५% इतके नोंदवले गेले आहे, निवडणूक आयोगाने गुरुवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *