Breaking News

मुख्यमंत्र्यांनंतर उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ते संकेताला धरून नव्हते पण… नामांतरप्रश्नी केली भूमिका स्पष्ट

महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी नामांतर करण्याचा घेतलेला निर्णय नव्याने स्थापन झालेल्या शिंद-फडणवीस सरकारने स्थगित केला. त्यावरून शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर चांगलीच टीका केली. या टीकेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला नामांतर करायचे असून तो बेकायदा निर्णय कायदेशीर ठरविण्यासाठी उद्या सकाळी मंत्रिमंडळाची बैठक घेवून निर्णय घेणार असल्याचे जाहिर केले. त्यापाठोपाठ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नामांतराचा निर्णय घेणार असल्याचे सांगत त्या निर्णयाला स्थगिती देण्यात आलेली नसल्याचे स्पष्ट केले.

नियम आणि परंपरा अशी आहे की ज्या वेळी राज्यपाल विश्वासदर्शक ठराव ठेवा म्हणून पत्र देतात, तेव्हा कुठलाही महत्त्वाचा निर्णय मंत्रिमंडळाने घ्यायचा नसतो. पूर्वी अनेक वेळा राज्यपाल बहुमत सिद्ध करण्यास सांगायचे. मात्र बैठक बोलवून मंत्रिमंडळ बरखास्तीचे निर्णय घेतले जायचे. त्यामुळे बहुमत सिद्ध करा, असे पत्र गेल्यानंतर कुठलाही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळावे, असे न्यायालयाने वेळोवळी सांगितलेले आहे. औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशीव किंवा नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देणे या मागण्यांना मागील सरकारने अडीच वर्षात हात लावला नाही. मात्र बहुमत गमावल्यानंतर बैठक बोलवून निर्णय घेतले. हे संकेतांना धरून नसल्याचे ते म्हणाले.

ही नावं द्यायची आहेत. आमचा अजेंडा हाच आहे. त्यामुळे ज्या सरकारकडे बहुमत आहे, त्याच सरकारचं मंत्रिमंडळ त्याला मान्यता देईल. म्हणून मुख्यमंत्र्यांनी ही नावं आमच्या अस्मितेची आहेत, महत्त्वाची आहेत. त्यामुळे अवैध बैठकीत ती देण्यात येऊ नयेत. बहुमत असलेल्या सरकारसमोर ती ठेवण्यात यावीत. आमच्या पुढच्या मंत्रिमंडळ बैठकीत ती समोर ठेवण्यात येतील, असे आयुक्तांना सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितल्याप्रमाणे हे तिन्ही निर्णय आमचे सरकार घेईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

महाविकास आघाडीला सरकारमध्ये बहुमत नव्हतं. पण मंत्रिमंडळ बैठकीतही त्यांना बहुमत नव्हतं. त्यामुळे नेमका कोणाचा निर्णय काय होता? हे समजू शकलेले नाही. आजही काही लोक दुटप्पी बोलत आहेत, असा टोला लगावत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय ठाम आहे, असेही ते म्हणाले.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या टीकेवर फडणवीस म्हणाले की, मी राज ठाकरे यांना भेटणार असल्याचे सभागृहातही जाहिर केले होते. त्यांच्यावर शस्त्रक्रिया झालेली असल्याने त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मी गेलो. मात्र काही जणांना मळमळायला का होतयं असा उपरोधिक टोला सुळे यांना लगावला.

Check Also

नाना पटोले यांची टीका, मुस्लिमांशी नाते घट्ट म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींचे पुन्हा मुस्लीम द्वेषावरच भाषण

मोदी सरकारने कधीच कोणाला धर्म विचारला नाही व धर्माच्या नावावर योजनाही राबवल्या नाहीत. मुस्लीमांशी आपले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *