Breaking News

दिपक केसरकर यांचा आरोप: मला पवारांनीच सांगितले, शिवसेना फुटी मागे ते स्वत: राज ठाकरे, नारायण राणे आणि छगन भुजबळांच्या बंडामागे शरद पवार

सध्या दिल्ली दौऱ्यावर असलेले शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीला हजेरी लावली. त्यानंतर काही प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना म्हणाले की, शिवसेना जेव्हा जेव्हा फुटली तेव्हा त्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचा हात होता असा खळबळजनक आरोप केला.

मी राष्ट्रवादीत होतो, त्यावेळी त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा शिवसेना फुटली तेव्हा त्यामागे शरद पवार होते ही वस्तुस्थिती असल्याचा दावाही करत आपण प्रत्येक गोष्टीचे साक्षीदार आहोत. मी राष्ट्रवादीत असताना ते विश्वासात घेऊन सांगायचे, असेही ते म्हणाले.

शरद पवारांनीच मला, जरी मी नारायण राणेंना बाहेर पडण्यासाठी मदत केली असली तरी कोणत्या पक्षात जावं याची अट ठेवलेली नाही असं सांगितलं होतं. हा निश्चितच त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. पण याचा अर्थ नारायण राणे यांना शिवसेनेतून बाहेर पडण्यासाठी शरद पवारांनीच मदत केली होती. भुजबळांना तर ते स्वत: बाहेर घेऊन गेले होते. राज ठाकरेंच्या पाठीशीही त्यांचे आशीर्वाद होते. राज ठाकरे त्यांना मानतात असा दावाही त्यांनी यावेळी केला.

त्यांनी शिवसेना का फोडली? बाळासाहेब जिवंत होते तेव्हा त्यांना यातना का दिल्या? याचं उत्तरही त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला दिलं पाहिजे असे सांगत मातोश्री कधी सिल्व्हर ओकच्या दारी गेल्याचं मी ऐकलेलं नाही. आपला पक्ष मोठा व्हावा, तो सत्तेत असावा ही शरद पवारांची इच्छा असणं स्वाभाविक आहे. पण बाळासाहेबांना हे कधीही मान्य नव्हतं असेही ते म्हणाले.

शिवसैनिक कधीही शरद पवारांच्या दावणीला बांधला जाणार नाही असेही ते म्हणाले. बाळासाहेबांनी मी शेवटची व्यक्ती असलो तरी मी काँग्रेसमध्ये जाणार नाही, पाठिंबा देणार नाही असं सांगितलं होतं. मग त्याच बाळासाहेबांच्या शिवसेनेने काँग्रेससोबत जाणं ही त्यांच्या विचारांशी प्रतारणा आहे असं मी समजतो. जर बाळासाहेबांना एक सर्वसामान्य शिवसैनिक मुख्यमंत्रीपदावर पाहायचा होता, तर हा एक सुखद धक्का आहे असेही त्यांनी सांगितले.

मला महाराष्ट्रभरातून असंख्य फोन येतात. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले याचा आनंद आहे, पण त्यांच्यासोबत उद्धव ठाकरेंचे आशीर्वादही हवेत असं सांगतात. हे आशीर्वाद मिळतील तेव्हा प्रत्येक शिवसैनिक आम्ही हिंदुत्ववादी आहोत असं सांगेल. आमचे खासदारही भाजपाला पाठिंबा देतील तेव्हा आम्ही एनडीएत सहभागी झालो असं म्हणू शकतो. महाराष्ट्राचा विधिमंडळ पक्ष भाजपासोबत गेल्याने आम्ही तांत्रिकदृष्ट्या एनडीएत सहभागी झाल्याचे ते म्हणाले.

भाजपाकडून शिंदे गटाला अधिकृत मान्यता आहे का? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, महाराष्ट्रात चुकीचं पसरवले जात आहे. मला अनेकांनी फोन करुन उद्धव ठाकरेंना दिल्लीत निमंत्रण का नाही असे विचारले. राष्ट्रपती पदाचा उमेदवार नेहमी मातोश्रीवर गेला आहे. मातोश्रीचा प्रतिनिधी कधीही राष्ट्रपती पदाच्या उमेदवारासंबंधी बैठकीला गेलेला नाही. तीच महती कायम ठेवली पाहिजे असं मी मानतो असेही ते म्हणाले.

शिवसेनेच्या वतीने मंत्रिमंडळाचा शपथविधी रोखण्यासाठी पत्र देण्यात आल्यासंबंधी विचारण्यात आलं असता केसरकर म्हणाले की, लहानपणी क्रिकेट खेळताना ज्याचा बॅट, बॉल असतो तो आऊट झाल्यावर सगळं घेऊन घरी जातो. याला आम्ही रडीचा डाव म्हणायचो. हा रडीचा खेळ राजकारणात असता कामा नये. राजकारण सर्वसामान्यांसाठी असून ते त्यांच्यासाठीच केलं पाहिजे. उद्धव ठाकरेंना चुकीच्या नेत्यांचं मार्गदर्शन होत असल्याने अशी पावलं उचलली जात असावीत अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या चार टप्प्यात ६६.९५ टक्के मतदान

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या चार टप्प्यात एकूण मतदान ६६.९५% इतके नोंदवले गेले आहे, निवडणूक आयोगाने गुरुवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *