Breaking News

शिंदे सरकारच्या शपथविधी सोहळ्यानंतर शरद पवार म्हणाले, फडणवीस नाराज मनाने… एकनाथ शिंदे आणि राज्याचे पहिले मुख्यमंत्री योगायोगाने साताऱ्याचे

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी राजीनामा देऊन २४ तास उलटत नाही तोच महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी आज झाला. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांनी नाराज मनाने उपमुख्यमंत्री पद स्विकारल्यासारखे वाटत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करत भाजपामधील असंवादावर बोट ठेवण्याचा प्रयत्न केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले.

एक स्थानिक बाब आहे, आत्ताचे मुख्यमंत्री आहेत ते मुळ साताऱ्याचे आहेत. योगायोग असा आहे की राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे साताऱ्याचे होते. मी पण मुळ कोरेगाव तालुक्याचा होतो. बाबसाहेब भोसले, पृथ्वीराज चव्हाण आणि आत्ता ज्यांनी शपध घेतली ते साताऱ्याचे आहेत, असं म्हणत शरद पवारांनी शिंदेच्या सातारा कनेक्शनचा उल्लेख केला.

मी एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवर बोललो, त्यांना शुभेच्छा दिल्या. राज्याचा प्रमुख झाल्यावर तो राज्याचा प्रतिनिधी होतो, राज्याचे सर्व विभागातील लोकांचे प्रश्न सोडवण्याची कामगिरी त्यांच्याकडून व्हावी, असेही पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी बोलल्याचे सांगितले.

एकनाथ शिंदेंच्या बंडासंदर्भात बोलताना हे महाविकास आघाडीचं अपयश असल्यासारखं वाटतं नाही असं पवार म्हणाले की, महाविकास आघाडी म्हणून कुठे कमी पडलो नाही. एकनाथ शिंदे हे त्यांच्या लोकांना बाहेर न्यायला प्रभावी ठरले. एवढ्या लोकांना बाहेर नेण्याची हिंमत दाखवली यातच त्यांचे यश आहे असेही ते म्हणाले.

तसेच उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वावर शंका उपस्थित केली जात असल्याबद्दल विचारण्यात आलं असता, माझ्या मते त्यांच्या कामाच्या पद्धतीमध्ये एकदा विश्वास टाकला की पूर्ण जबाबादारी द्यायची. विधिमंडळाची पुर्ण जबाबदारी ही एकनाथ शिंदे यांच्याकडे उद्धव ठाकरे यांनी दिली होती. ज्या वेळेला ३९ लोकं राज्याच्या बाहेर जातात त्यात दुरुस्त करायला स्कोप राहत नाही, असेही ते म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ अगदी ऐनवेळी घेतल्यासंदर्भात भाष्य करताना पवारांनी, फडणवीस यांनी नंबर दोनची जागा आनंदाने स्वीकारली आहे असं वाटत नाही. त्यांचा चेहरा तसं सांगत नाही. पण ते नागपुरचे आहेत. एकदा आदेश आला की तो पाळायचा असतो, हे कारण असावे दुसरे कारण नसावे, अशी सूचक प्रतिक्रियाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Check Also

नाना पटोले यांची टीका, मुस्लिमांशी नाते घट्ट म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींचे पुन्हा मुस्लीम द्वेषावरच भाषण

मोदी सरकारने कधीच कोणाला धर्म विचारला नाही व धर्माच्या नावावर योजनाही राबवल्या नाहीत. मुस्लीमांशी आपले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *