Breaking News

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर राज ठाकरे यांनी दिल्या ‘सावध’ शुभेच्छा किमान तुम्ही तरी सावध पावले टाका

राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी पार पडल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फारच सावध शुभेच्छा दिल्या. तसेच किमान तुम्ही तरी सावध पावले टाका अशा शुभेच्छा ट्विट करत दिल्या. या ट्विटच्या माध्यमातून राज ठाकरे यांनी नेमके कोणापासून सावध रहा असा गर्भित इशारा दिला यावरून राजकिय वर्तुळात अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या पाठिंब्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी त्यांचे खास पोस्ट करुन कौतुक केलं आहे. दुपारीच राज यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेना पक्षप्रमुख आणि कालच राजीनामा दिलेले माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर टीका करणारी पोस्ट केल्यानंतर शिंदेंच्या शपथविधीच्या काही मिनिटांमध्येच त्यांना शुभेच्छा देणारी पोस्ट केलीय.
राज यांनी मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तीन भाषांमध्ये एकनाथ शिंदेंना शुभेच्छा देणारी पोस्ट केलीय. यामध्ये राज यांनी, “एकनाथ शिंदेजी, आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालात. आपले अभिनंदन. खरंच मनापासून आनंद झाला,” असं म्हटल आहे. पुढे बोलताना त्यांनी, “नशिबाने आपल्याला मुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली आहे. आता ती स्वकर्तृत्वाने सिद्ध कराल अशी आशा,” असेही म्हटलं आहे. तर पोस्टच्या शेवटी त्यांनी एकनाथ शिंदे यांना सूचक इशारा देताना, “आपण तरी बेसावध राहू नका. सावधपणे पावले टाका,” असेही आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
एकनाथ शिंदे यांनी आज सायंकाळी मुख्यमंत्रीपदाची तर भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राजभवनामध्ये पार पडलेल्या या सोहळ्याला भाजपाचे अनेक नेते उपस्थित होते. बंडखोर आमदार अद्याप गोव्यामध्ये असल्याने शिवसेनेकडे अगदीच मोजके लोक या सोहळ्याचा उपस्थित असल्याचं दिसून आलं.

Check Also

काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुश्ताक अंतुले यांच्यासह अनेक लोकं आपल्यासोबत येत आहेत याचा अर्थ अजित पवार यांनी घेतलेला महत्वपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *