Breaking News

अस्थिर राजकिय परिस्थितीवर अमोल मिटकरी म्हणाले, अजून बरंच काही… राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याबाबत व्यक्त केला संशय

राज्यात शिवसेनेतील अंतर्गत बंडाळीमुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाच्या नेत्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेवून सांगितले. त्यामुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाविकास आघाडी सरकारला बहुमत सिध्द करण्याचे आदेश दिले. या आदेशाच्या विरोधात राज्य सरकार आणि शिवसेनेच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत दाद मागितली. त्यामुळे पुढील ४८ तासात राज्याच्या राजकारणात नेमके काय घडणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सूचक शब्दात ट्विट केल्याने चर्चेला उधाण आले आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी संध्याकाळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट घेतली. त्यानंतर राज्यपालांनी बहुमत चाचणीसंदर्भात निर्देश काढले. यानुसार ३० जून रोजी विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. मात्र, राज्यपालांच्या निर्देशां विरोधात महाविकास आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. दुसरीकडे गुवाहाटीमध्ये कामाख्या देवीचं दर्शन घेतल्यानंतर बंडखोर आमदार गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी सर्व आमदार बहुमत चाचणीला मुंबईत जाणार असून त्यात आमचा विजय होईल, असा विश्वास व्यक्त करत मुंबईत आल्यानंतर सर्व आमदार बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे दर्शन घेण्यासाठीही जाणार असल्याचे जाहिर केले. त्यामुळे राज्यातलं राजकारण चांगलंच तापलं आहे.

राज्यपालांच्या निर्देशांनंतर भाजपाकडून ४८ तासांचा अल्टिमेटम राज्य सरकारला दिला जात आहे. त्यावर अमोल मिटकरींनी ट्वीटच्या माध्यमातून निशाणा साधला आहे. अति उतावीळ वऱ्हाडाला पाहुणचार म्हणून दगड गोटे मिळाल्याची घटना महाराष्ट्रात ताजी आहे. सरकार स्थापनेचा उतावीळपणा करत ’४८’ तासाचा अल्टीमेटम देणाऱ्या उतावीळ नवऱ्यांनो…अजून बरच काही बाकी आहे, असे सूचक वक्तव्य मिटकरी यांनी आपल्या ट्वीटच्या माध्यमातून केले.
महामहिम राज्यपाल महोदय दडपशाही खाली आहेत का? हे सुद्धा तपासले पाहिजे. इकडे सोळा आमदारांचा निर्णय अजूनपर्यंत होत नाही आणि बहुमत चाचणीचा आदेश एका रात्रीत निघतो, हे कसे? नक्कीच काहीतरी गडबड आहे, असा संशयही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

दरम्यान, आपल्या ट्वीटमध्ये मिटकरींनी कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांच्या स्पष्टीकरणाचा देखील उल्लेख केला आहे. मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाला विश्वासात घेतल्या शिवाय राज्यपाल बहुमत चाचणी प्रक्रिया घेतील तर ते घटनाबाह्य ठरेल – उल्हास बापट (घटनातज्ञ).. राज्यपालांचे अनेक वर्तन घटना विरोधी, असंही मिटकरींनी ट्विटरवर नमूद केले आहे.

Check Also

नाना पटोले यांची टीका, मुस्लिमांशी नाते घट्ट म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींचे पुन्हा मुस्लीम द्वेषावरच भाषण

मोदी सरकारने कधीच कोणाला धर्म विचारला नाही व धर्माच्या नावावर योजनाही राबवल्या नाहीत. मुस्लीमांशी आपले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *