Breaking News

उद्यापासून राजकिय वातावरण तापायला सुरुवात होणार सोमवारपासून अर्थसंकल्पिय अधिवेशनाला सुरुवात

मुंबई : प्रतिनिधी

राज्याला आर्थिक दिशा दाखविणाऱ्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात होणार आहे. मात्र तत्पूर्वी या अधिवेशनाच्या अनुषंगाने विधिमंडळातील सर्व विरोधी पक्षांची रविवारी दुपारी एक बैठक होत असून त्यात सरकारला घेरण्याची रणनीती ठरविण्यात येणार आहे. त्यामुळे उन्हाळा सुरु होण्यास आता काही दिवसांचा अवधी शिल्लक राहीलेला असला तरी राजकिय वातावरण अधिवेशनाच्या निमित्ताने तापायला सुरुवात झाली आहे. या तापलेल्या वातावरणात राज्य सरकार तावून सलाखून निघणार की गळपटणार हे या अधिवेशनात पाह्यला मिळणार आहे.

मागील वर्षभरात राज्यात मेक इन इंडिया गुंतवणूक समेटमध्ये घोषित केल्याप्रमाणे राज्यात न झालेली गुंतवणूक, शेतकऱ्यांची कर्जमाफी, गारपीट-ओखी वादळांमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे झालेले नुकसान आणि त्यांना न मिळालेली आर्थिक मदत यासह मंत्रालयात धर्मा पाटील यांच्यासह अनेकांनी केलेला आत्महत्येचा प्रयत्न याम प्रमुख विषयांवर विरोधकांकडून राज्य सरकारला जाब विचारला जाणार आहे. या पाठोपाठ पुणे जिल्ह्यातील भीमा-कोरेगांव येथे दलित समाजावर करण्यात आलेली दगडफेक आणि त्यांच्या मालमत्तेचे नुकसान यासह त्यानंतर राज्यात निर्माण झालेला जातीय तणाव, या तणावास कारणीभूत ठरलेले मनोहर उर्फ संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हा दाखल होवून अद्याप अटक न होणे याप्रश्नांवरही विरोधकांकडून विधिमंडळात सरकारला घेरण्यात येणार आहे.

अर्थसंकल्पिय अधिवेशन २६ मार्च पर्यंत चालणार असल्याने राज्य सरकारला विरोधकांकडून पदोपदी चांगलेच कोंडीच पकडले जाण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पार्टी, पीपल्स रिपब्लिकन पक्ष, शेकाप यासह सर्व विरोधी पक्षांची बैठक उद्या दुपारी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या निवासस्थानी होणार आहे. या बैठकीत पुन्हा एकदा राज्य सरकारच्या चहापानावर विरोधकांकडून बहिष्कार टाकला जाण्याची शक्यता आहे.

 

Check Also

नाना पटोले यांची टीका,… हा तर छत्रपती शिवरायांचा अपमान

हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षाकडून सातत्याने केला जात आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *