Breaking News

बंडातात्या कराडकरांनी मागितली माफी, पण अडचणी वाढल्याच ऐकीव माहितीवर बोललो बदनामीचा हेतू नव्हता

मराठी ई-बातम्या टीम

राज्यातील प्रसिध्द किर्तनकार आणि वारकरी संप्रदायाचे प्रमुख बंडातात्या कराडकर यांनी कालच कोणत्या राजकिय नेत्यांची मुलं दारू पीत नाहीत हे विचारा असा प्रतिप्रश्न करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, भाजपाच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांची नावे घेत आक्षेपार्ह विधाने केली. मात्र त्यांच्या या वक्तव्याने काल टीकेची झोड उठताच आणि त्यांच्या विरोधात आंदोलने सुरु होताच अखेर बंडातात्या कराडकर यांनी आपल्या वक्तव्यासह माघार घेत सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे यांची जाहीर माफी मागितली. तसेच आपण ऐकीव माहितीवर बोललो असल्याचे स्ष्ट करत अनवधानाने बोलल्याचा खुलासा केला.

तसेच खासदार सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे या निर्व्यसनी आणि सदाचारी असल्याचे सांगत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही माफीही मागतो असे त्यांनी सांगितले.

सुप्रियाताई आणि पंकजाताई यांच्याबद्दल मी आकसाने बोललो नाही. मी केवळ समाजातील ऐकीव माहितीवर ते विधान केलं होते. माझे पंकजा मुंडे आणि सुप्रिया सुळे यांच्याशी माझ बोलणं झालं नाही. त्यांना भेटून मी दिलगीरी व्यक्त करणार आहे. पंकजा आणि सुप्रियाताई यांचं वर्तन चुकीचं नाही. त्या सदाचारी आहेत. या दोन्ही नेत्या निर्व्यसनी असल्याचे त्यांनी सांगितले.

सुप्रिया सुळे आणि मी अनेकवेळेला अनेक कार्यक्रमात एकत्र आलो आहे. आमचा एकमेकांशी संवादही झालेला आहे. मी त्यांना ताई म्हणतो. पंकजा यांना मी कधीच भेटलो नाही. पण त्यांचे वडील गोपीनाथ मुंडे यांचं आणि माझं प्रेमाचं नातं होते. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मी आमच्या वयात दहा-बारा वर्षाचा फरक असला तरी मी सुप्रियाताईंना मी कन्येच्या ठिकाणी मानतो. पंकजा यांनाही कन्येच्या ठिकाणी मानतो. त्यांच्या भावनांचा उद्रेक झाला असेल तरी या दोन्ही माझ्या मुली समजून बाप या नात्याने मी क्षमा मागत आहे. त्याबद्दल मला कोणताही कमीपणा वाटत नसल्याचे सांगत त्याचबरोबर मी त्यांना विनंती करेल की तुमच्या अनुयायांच्या भावनांचा उद्रेक होऊ नये याची त्यांनी दक्षता घ्यावी, अशी विनंतीही केली.

राजकीय नेत्यांची माफी मागितल्याने माझं अध्यात्मिक आणि नैतिक वजन वाढलेच असल्याचे सांगत  माझ्या ७० वर्षाच्या जीवनात माझा कुठेच वाकडा पाय पडला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, सातारा पोलिसांनी बंडातात्या कराडकर यांची पोलिसांनी चौकशी करण्यास सुरुवात केली असून एक तासाहून अधिक काळ त्यांची चौकशी सुरु आहे. तर पुणे येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी रूपाली ठोंबरे-पाटील यांनी बंडातात्या कराडकर यांच्या विरोधात स्थानिक न्यायालयात याचिका आज दाखल केली. तर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी कराडकर यांना आयोगाच्यावतीने नोटीस पाठवित लेखी खुलासा मागितला आहे.

Check Also

नाना पटोले यांची टीका, मुस्लिमांशी नाते घट्ट म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींचे पुन्हा मुस्लीम द्वेषावरच भाषण

मोदी सरकारने कधीच कोणाला धर्म विचारला नाही व धर्माच्या नावावर योजनाही राबवल्या नाहीत. मुस्लीमांशी आपले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *