Breaking News

शांतता, सौहार्दाच्या वातावरणाची निर्मिती ही विश्व कल्याणासाठीची सर्वात मोठी गरज राज्यपाल चे. विद्यासागर राव यांचे प्रतिपादन

मुंबई : प्रतिनिधी

व्यक्तिगत, सामाजिक ते राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर शांतता, सौहार्दाच्या वातावरणाची निर्मिती ही आजची सर्वात मोठी गरज आहे. त्यादृष्टीने एक आश्वासक पाऊल म्हणून आंतरराष्ट्रीय अहिंसा संशोधन व अध्यात्म तंत्रज्ञान प्रशिक्षण संस्थेने (आय-एआरटीआयएसटी-आय- आर्टिस्ट) विज्ञानाला अध्यात्माची जोड देण्यासाठी शाळा आणि महाविद्यालयांबरोबर काम करावे, असे आवाहन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज येथे केले.

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर राजभवन येथे तुलसी महाप्रग्या प्रग्या भारती ट्रस्टच्या (विरार) इंटरनॅशनल अहिंसा रिसर्च ॲण्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ऑफ स्पिरीच्युअल टेक्नॉलॉजी (आय-स्मार्ट) या स्वायत्त संस्थेचा शुभारंभ आज  राज्यपाल श्री. राव यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते  बोलत होते.

योग ही भारतीय संस्कृतीची देणगी असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नातून आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या स्वरुपात जगाने योगाला स्वीकारले ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे, असे सांगून राज्यपाल म्हणाले की, गेल्या चार वर्षात जगातील अनेक देशांमध्ये योगाचा प्रसार झाला. आज न्यूयॉर्क, लंडन, पॅरिस आणि इतर अनेक ग्लोबल शहरे आणि जगभरातील सर्व खंडांमध्ये योग दिन साजरा केला जात आहे.

योग ही केवळ शरीर निरोगी ठेवण्यासाठीची व्यायाम पद्धती नसून मन आणि आत्मा यांना एकात्म करणारी जीवन पद्धती आहे. मन: शांती, आत्मिक शांती आणि आत्म-संयम विकसित करणे हे योगाचे अंतिम उद्दिष्ट आहे. आज मानवी समाज हिंसा, तणाव, क्रुरता, लोभ, भ्रष्टाचार, निराशा, शारीरिक व्याधी आदींसारख्या समस्यांना तोंड देत आहे. समाजातील सर्वच व्यक्ती आज तणावाला सामोरे जात आहेत. वैयक्तिक पातळीवर, सामाजिक स्तरावर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही अशांतता, गोंधळ आणि अस्वस्थता आहे. काही देश युद्ध आणि विनाशाची भाषा करत आहेत. हे पाहता विश्वाला अध्यात्मिक शिकवण देण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

वैयक्तिक आणि समाजातील स्तरावरील शांतीच्या अभावाचा विपरीत परिणाम जैवसाखळी, पर्यावरण आणि निसर्गावर होत आहे. जीवनशैलीशी संबंधित अनेक आजार हे व्यक्तिगत ताण तणावामुळे होत असल्याचे दिसून आले आहे. एकीकडे विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे जीवन सुखकर झाले असून जग जवळ येत आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला या तंत्रज्ञानाची काही नवीन आव्हानेही उभी रहात आहेत, असेही ते म्हणाले.

विज्ञान आणि तंत्रज्ञान आपल्यासाठी आवश्यक भौतिक वस्तूंची निर्मिती करण्याची पद्धती शिकवू शकते. मात्र, मानवतेसाठी या वस्तूंचा उपयोग करण्याचा विवेक आध्यात्मिक सजगतेमुळे येतो. सुदृढ, सुसंस्कृत समाजाच्या निर्मितीसाठी आपल्याला विज्ञान आणि आध्यात्माचे एकत्रिकरण करायचे असल्याचे त्यांनी सांगितले.

जगात सर्वात तरुण लोकसंख्या हे आपले बलस्थान असून २०२० पर्यंत भारतीयांचे सरासरी वय २९ वर्षे असेल. अमेरिका किंवा चिनी समाजाच्या सरासरी वयापेक्षा ते 8 वर्षांहून कमी असेल. आपल्याला या युवा शक्तीच्या शारीरिक,मानसिक आणि आध्यात्मिक सक्षमीकरणासाठी काम करावे लागेल. एक निरोगी समाज आणि सुदृढ राष्ट्र निर्माण करणे हे वैज्ञानिक तसेच तंत्रज्ञानाधारित अध्यात्माच्या माध्यमातून साध्य होईल, असा मला विश्वास आहे, असेही प्रतिपादन त्यांनी केले.

या कार्यक्रमात मुनी कमल कुमारजी, डॉ. मुनी अभिजीत कुमारजी, प्रताप संचेती आदींनी मनोगत व्यक्त केले. आमदार मंगल प्रभात लोढा, जैन विश्व भारती संस्थेचे मानद प्राध्यापक मुनी महेंद्र कुमारजी, मुनी कमल कुमारजी, मुनी डॉ. अभिजित कुमार, प्रताप संचेती, डॉ. एस. के. जैन, रवींद्र संघवी आदी या प्रसंगी उपस्थित होते.

Check Also

नवनीत राणा यांचे पुन्हा एकदा असदुद्दीन ओवेसी यांच्या विरोधात चिथावणी वक्तव्य

एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांना भाजपा नेत्या नवनीत राणा म्हणाल्या की “राम भक्त” (प्रभू रामाचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *