Breaking News

अजित पवार यांनी काढला अब्दुल सत्तारांचा जमिन घोटाळा, हकालपट्टीच्या मागणीवरून गोंधळ विरोधक आक्रमकः सभागृहाचे कामकाज पाच वेळा तहकूब

सर्वोच्च न्यायालयाचा व राज्य सरकारच्या निर्णयाच्या सर्व बाबी समोर असताना एका व्यक्तीला त्यामध्ये फायदा मिळवून देत मंत्री पदाचा दुरुपयोग केला आहे. ही बाब अतिशय गंभीर असून याप्रकरणाची जबाबदारी स्वीकारुन अब्दुल सत्तार यांनी आपल्या पदाचा तात्काळ राजीनामा दिला पाहिजे त्यांनी राजीनामा नाही दिला तर मुख्यमंत्र्यांनी त्यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज सभागृहात केली.

विधानसभेत दुपारच्या सत्रात अजित पवार यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर उच्च न्यायालयाने ओढलेले ताशेरे आणि भूखंड वाटपप्रकरणी दोषी ठरविले. याप्रश्नी अजित पवार यांनी स्थगन प्रस्ताव विधानसभेत मांडला. मात्र तो स्थगन प्रस्ताव विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी फेटाळून लावला.

परवा सभागृहात मुख्यमंत्र्यांनी एनआयटीप्रकरणात दिलेल्या निर्णयासंदर्भात चर्चा केली. परंतु आताच उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्याविषयी अत्यंत कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत. त्यांनी पदाचा दुरुपयोग केला असे निरीक्षण नोंदविल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.

अब्दुल सत्तार हे महसूल राज्यमंत्री होते आणि आमच्या मंत्रिमंडळात एकनाथराव होते आणि तेच मुख्यमंत्री म्हणून कसे चालतात तुम्हाला सोयीचं चालतंय आणि नसेल ते आमच्यावर ढकला वा रे पठ्ठे… अशा शब्दात सत्ताधारी आमदारांनी केलेल्या वक्तव्याला अजित पवार यांनी उत्तर दिले.

मौजे घोडबाभूळ (जिल्हा वाशीम) येथील सरकारी गायरान जमीन गट नं. ४४ मधील ३७ एकर १९ गुंठे जमिनीचा हा घोटाळा आहे. हा घोटाळा दीडशे कोटींचा आहे. गायरान जमीनी कुणाला देता येत नाही. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे. त्याचे पालन आपण करत आलो आहोत असे असताना योगेश खंडारे यांनी जिल्हा न्यायालयात मागणी केली होती त्यांची ती मागणी फेटाळून लावली. जिल्हा न्यायालयाने योगेश खंडारे यांचा त्या जमिनीवर कोणताही अधिकार नसताना तो ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत होता. सरकारी गायरान जमीन हडपण्याचा त्याचा इरादा होता असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवल्याचे अजित पवार यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.

तत्कालिन महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आला होता. आणि राज्य सरकारचा जो आदेश होता याची संपूर्ण माहिती असताना काही दिवस आधी म्हणजे जून महिन्यात ठाकरे सरकार जाणार की राहणार यावेळी १७ जून २०२२ ला ३७ एकर गायरान जमीन योगेश खंडारे या व्यक्तीला वाटप करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय सर्व कायदेशीर बाबींचे उल्लंघन करणारा होता. या याचिकेच्या सुनावणी दरम्यान नागपूर खंडपीठाने आपले गंभीर निरीक्षण नोंदवले आहे. तत्कालीन महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरुद्ध प्रथमदर्शनी ठोस पुरावे उपलब्ध आहेत. जिल्हा न्यायालयाचा आदेश माहिती असूनही राज्यमंत्री अब्दुल सत्तारांनी निर्णय घेतल्याची बाबही त्यांनी निदर्शनास आणून दिली.

जगपाल सिंग प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आणि राज्य सरकारच्या शासन निर्णयाची राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी पायमल्ली केली आहे. एवढंच नाही तर महसूल मंत्री यांच्या अखत्यारीत काम करणार्‍या जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल राज्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय अवैध वाटल्याने त्यांनी ५ जुलै २०२२ ला महसूलचे अतिरिक्त मुख्य सचिवांना पत्र लिहिले. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते आणि त्यांचे सरकार आले होते. त्यात वादग्रस्त आदेशाचा अंमल केल्यास सर्वोच्च न्यायालयाचा अनादर होईल असे कळवले. मात्र त्या पत्रावर सरकारने कारवाई केली नाही ही गोष्टही निदर्शनास अजित पवार यांनी आणून दिली.

दरम्यान, विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्थगन प्रस्ताव फेटाळल्याचे जाहिर केले. त्यानंतर विरोधकांनी अब्दुल सत्तार यांची हकालपट्टी करा या मागणीवरून सभागृहात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे सभागृहाचे कामकाज पाच वेळा बंद पाडले.

Check Also

नवनीत राणा यांचे पुन्हा एकदा असदुद्दीन ओवेसी यांच्या विरोधात चिथावणी वक्तव्य

एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांना भाजपा नेत्या नवनीत राणा म्हणाल्या की “राम भक्त” (प्रभू रामाचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *