राज्यात मागील वर्षी शिवसेनेतून शिंदे गटाने बंड केल्यांनतर शिवसेनेमध्ये मोठी फूट पडली. त्यानंतर पक्ष आणि चिन्हावर शिंदे गटाने आपला दावा सांगितला होता. पुढेनंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आणि त्यानंतर निवडणूक आयोगाकडे गेले. काही महिन्यापूर्वी निवडणूक आयोगाने निकाल देताना, शिवसेना पक्ष व चिन्ह हे शिंदे गटाच्या शिवसेनेला दिले आहे. मात्र शिंदे गटाच्या बंडानंतर सर्वोच्च न्यायालयाने खरा शिवसेना पक्ष कोणाचा आणि शिंदे गटातील १६ आमदारांबाबतचा निर्णय विधानसभा अध्यक्षांवर सोपवित निश्चित कालवधीत निर्णय घेण्याचा निकाल दिला. त्यानुसार विद्यमान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या आमदारांना नोटीसा पाठवित लेखी निवदेन सादर करण्यास सांगितल्यानंतर त्या आमदारांना आपली बाजू मांडण्यासाठी दोन दिवसांनी बोलविण्यास सुरुवात करणार असल्याचे सांगितले.
शिवसेनेच्या ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या विरोधात असलेल्या या याचिकेवर सुनावणी आता विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात होणार आहे. शिवसेना आमदार अपात्र प्रकरणातील सुनावणी १४ सप्टेंबरला दुपारी १२ वाजता होणार आहे. एकाच दिवशी सर्व आमदारांची सुनावणी होणार आहे. एकाच दिवशी तब्बल ३४ याचिकांवर विधानसभा अध्यक्ष सर्व आमदारांची सुनावणी घेणार असल्याचे सांगितले जात आहे.
अध्यक्षांनी दोन्ही गटाच्या आमदारांना नोटीसा पाठवल्या होत्या. या दोन्ही गटाकडून उत्तर मिळाले असून यावरची सुनावणी आता होणार आहे.
शिवसेना ठाकरे गटाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर आमदार अपात्रतेचा निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांकडे देण्यात आला होता. त्यानुसार यात वादी आणि प्रतिवादी आमदारांना पुरावे सादर करत म्हणणे मांडण्याची संधी दिली जाणार आहे. विधिमंडळात होणाऱ्या या सुनावणीसाठी शिवसेनेच्या दोन्ही गटांना नोटीस बजावण्यात आली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या ४० तर ठाकरे गटाच्या १४ आमदारांना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नोटीस बजावली.