Breaking News

स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्याला फडणवीसांची पाठ मात्र गडकरी, मुख्यमंत्री हजर नांदूर शिंगोटे येथे लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मारकाचे व पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत संपन्न

भाजपाचे नेते तथा केंद्रीय कृषीमंत्री स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण नाशिक येथील नांदूर शिंगोटे येथे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आणि गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या तथा माजी मंत्री पंकजा मुंडे या उपस्थितीत करण्यात आले. मात्र या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहिले नसल्याने राजकिय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले.

२०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणूकीत पंकजा मुंडे यांच्या पराभव करत राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे हे विजयी झाले. मात्र या विजयासाठी पंकजा मुंडे यांच्या विरोधात धनंजय मुंडे यांना देवेंद्र फडणवीस यांनीच रसद पुरविल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती. त्यानंतर अनेकदा पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात सुरु असलेले शीतयुध्दाची या ना त्या कारणाने सातत्याने चर्चा सुरु राहिली. मात्र नाशिक येथील गोपीनाथ मुंडे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्याला दिल्लीहून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आवर्जून उपस्थित राहिले. तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मुंडे कन्या पंकजा मुंडे याही उपस्थित राहिल्या. मात्र देवेंद्र फडणवीस हे गैरहजर राहिले. यासंदर्भात पंकजा मुंडे यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, मीच या कार्यक्रमाला निमंत्रित आहे. त्यामुळे याबद्दलची माहिती नाही.

दरम्यान मुंडे यांच्या पुतळ्याचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते केल्यानंतर झालेल्या कार्यक्रमात बोलताना म्हणाले, लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांनी अठरापगड जातीसाठी काम केले. गोपीनाथ मुंडे हे आपल्या कामामुळे लोकनेते या बिरूदाचे मुकुटमणी होते.

नांदूर शिंगोटे, ता. सिन्नर, येथे लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मारकाचे व पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते संपन्न झाले. पालकमंत्री दादाजी भुसे, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारतीताई पवार, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार प्रितम मुंडे, खासदार हेमंत गोडसे, माजी मंत्री छगनराव भुजबळ, बाळासाहेब थोरात, पंकजाताई मुंडे, आमदार नरेंद्र दराडे, किशोर दराडे, माणिकराव कोकाटे, देवयानी फरांदे, मोनिका राजळे, सुहास कांदे, हिरामण खोसकर, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जि.प च्या मुख्य कार्यकारी अधिकारी अमिषा मित्तल, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शितल सांगळे, माजी आमदार प्रकाश वाजे, उदय सांगळे, हेमंत धात्रक आदि मान्यवर उपस्थित होते.

अवकाळीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य शासन भरपाई देणार –

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, हे सरकार शेतक-यांचे, सर्वसामान्यांचे आणि गोपीनाथ मुंडे यांच्या विचारांवर चालणारे असल्याने शेतक-यांनी घाबरून जाऊ नये, असे आश्वासन देत अवकाळी पाऊसाने झालेल्या नुकसानीची भरपाई शासन देणार, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा दिला.

राज्याच्या अर्थसंकल्पात सर्वसामान्य नागरिकांना नजरेसमोर ठेवून योजना आखल्या आहेत. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेअंतर्गत भरघोस तरतुद केली आहेत. उसतोड कामगारांच्या मुलांसाठी प्रमुख शहरांमध्ये वसतीगृह उभारण्यात येतील. उसतोड कामगार महामंडळास निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही असे आश्वासन देऊन स्व.गोपीनाथ मुंडे यांना विनम्र अभिवादन केले.

स्व. मुंडे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेऊ: नितीन गडकरी

लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अग्रेसर होते. समाजातील तळागाळातील नागरिकांसाठी ते योद्धे होते. दलित, पिडीत, शोषित, गरीब समाजाला न्याय देण्यासाठी आपले आयुष्यपणास लावले. कृष्णाखोरे, तापी पाटबंधारे विदर्भ सिंचनाच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांसाठी काम केले. मानवतेच्या, एकतेच्या, समतेच्या आधारावर सर्व समाजाचा विकास होण्यासाठी गोपीनाथरा मुंडे प्रयत्नशील होते. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत असताना शेतक-यांच्या मुलांसाठी विविध योजना राबवाव्या लागतील. शेतकरी

अन्नदाताबरोबरच उर्जा दाता बनला पाहिजेत. स्मार्ट सिटी बरोबरच स्मार्ट व्हिलेज ही संकल्पना अंमलात आणणे गरजेचे आहे. असे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

अहमदनगर जिल्ह्यात गोपीनाथ गडाची निर्मिती करणार-राधाकृष्ण विखे पाटील

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, आजच्या स्मारकामुळे गोपीनाथराव मुंडे यांच्या आठवणींना उजाळा मिळाला असून असा नेता पुन्हा होणार नाही. स्व.गोपीनाथ मुंडेच्या स्मरणार्थ अहमदनगर जिल्ह्यात गोपीनाथ गडाची निर्मिती करणार असल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

सर्व समाजाला न्याय हीच गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली
माजी मंत्री तथा आमदार छगनराव भुजबळ म्हणाले की, लोकांसाठी काम केलेल्या व्यक्तीवर प्रेम करण्यासाठी हजारो लोक स्वयंस्फूर्तीने येत असतात. बहुजनांना एकत्र आणण्याचे काम गोपीनाथराव मुंडे यांनी केले असून, ओबीसींची गणना झाली पाहिजे, मंडल आयोगाची अमलबजावणी झाली पाहिजेत यासाठी ते नेहमीच आग्रही राहिले. सर्व समाजाला न्याय देण्याची भूमिका घेणे, हीच स्व. गोपीनाथराव मुंडे यांना खरी श्रध्दांजली ठरेल असे त्यांनी सांगितले.

माजी मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, भगवान बाबांची भक्ती, शाहू, फुले, आंबेडकरांचे विचार आचरणात आणणारे, गोरगरीब जनतेसाठी झटणारे गोपीनाथराव मुंडे यांचे स्मारक उभे राहत आहेत याचा अभिमान आहे. स्व. मुंडे आणि श्री. गडकरी यांची काम करण्याची पध्दत एकसारखी होती. या दोघे ज्येष्ठ नेत्यांचा विकासाचा वारसा पुढे चालवू असे आश्वासित करून गोपीनाथ मुंडे यांच्या स्मरणार्थ उसतोड कामगारांच्या मुलांसाठी वसतीगृह, औरंगाबाद येथे दवाखाना उभारा, असे आवाहनही पंकजा मुंडे यांनी यावेळी केले.

राजकारण व काम एकत्र न आणता काम करणारे स्व. गोपीनाथराव मुंडे सर्व पक्षात लोकप्रियतेत आघाडीवर असल्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उदय सांगळे यांनी तर उपस्थितांचे आभार माजी आमदार प्रकाश वाजे यांनी मानले. कार्यक्रमास राज्यभरातून नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, भारतीय रेल्वेचे ७० टक्के खासगीकरण

भारतीय जनता पक्षाला माझे आव्हान आहे की, मी जी माहिती देत आहे ती खोटी आहे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *