Breaking News

भोंग्यावरून महाराष्ट्रात चालवलेला तमाशा बंद करा मोदी सरकारचे अपयश लपवण्यासाठी भाजपाकडून राज ठाकरेंचा वापर-नाना पटोले

भोंग्याचा मुद्दा पुढे करून महाराष्ट्रातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत. या प्रकारामुळे राज्याची बदनामी तर होत आहेच, पण गुंतवणुकीवरही परिणाम होईल आणि रोजगार निर्मितीला खिळ बसण्याचा धोका आहे. घटनेने सर्वांना धार्मिक स्वातंत्र्य दिलेले आहे. त्यात जर कोणी अडथळे आणत असतील त्यांच्यावर राज्य सरकारने कठोर कारवाई करावी व महाराष्ट्राला बदनाम करण्यासाठी चालवलेला हा तमाशा बंद करावा, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मनसेला दिला.

यासंदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की, सर्व धर्मियांना त्यांचे सण, उत्सव साजरे करण्याचे स्वातंत्र्य घटनेने दिले आहे. जे लोक दुसऱ्या धर्माच्या आड येतात. रमाजान सारख्या पवित्र सणात अडथळे आणत असतील तर त्यांच्यावर राज्य सरकारने कडक कारवाई केली पाहिजे. महाराष्ट्र हे कायद्याचे राज्य आहे. सुप्रीम कोर्टाचे भोंग्याबाबत जे निर्देश आहेत, त्याप्रमाणे सरकार कारवाई करत आहे. पण त्याचा बाऊ करून जर कोणी राज्यात अशांतता निर्माण करत असेल तर ती खपवून घेतली जाणार नाही. राज्यात धार्मिक अस्थिरता निर्माण करून राज्याच्या विकासाला खिळ घालण्याचे काम केले जात आहे. राज ठाकरे यांनी तरुणांची माथी भडकवण्यापेक्षा त्यांच्या हाताला रोजगार देण्याचा विचार करावा. राज ठाकरे यांना पुढे करून भाजपा केंद्रातील मोदी सरकारचे अपयश लपवण्यासाठी वापर करत आहे. केंद्रातील सरकारला राज ठाकरे यांनी जाब विचारला पाहिजे, परंतु दुर्दैवाने त्यांच्या भाषणात सामान्य जनतेला भेडसावणाऱ्या महागाई, बेरोजगारी, शेतकरी, कामगार यांच्या प्रश्नावर एकही शब्द नव्हता. भारतीय जनता पक्ष राज ठाकरे यांच्या भोंग्याचा वापर करुन घेत आहे.

अडीच वर्षापूर्वी सत्ता गेल्यापासून राज्यातील भाजपाच्या नेत्यांना झोप येत नाही. देवेंद्र फडणवीस यांनी बुस्टर सभेच्या नावाखाली घेतलेल्या सभेतील त्यांचे भाषण हे केवळ सत्तेवाचून त्यांची होत असलेली तडफड दाखवणारी होती. अयोध्यातील बाबरी मशिद आम्हीच पाडली अशा फुशारक्या ते आता मारत आहेत. अयोध्येतील मस्जिद भाजपाने पाडली असे त्यांचे म्हणणे खरे धरले तरी त्यात आश्चर्य वाटण्याचे काही कारण नाही. मुळात भारतीय जनता पक्ष हा विध्वंस करणारा आहे तो पाडणारा, तोडणारा पक्ष आहे, त्यांच्याहातून चांगले काही निर्माण होऊच शकत नाही, काँग्रेस पक्ष मात्र नेहमीच जोडणारा, नवे निर्माण करणारा पक्ष आहे, काँग्रेस तोडफोडीच्या राजकारणावर विश्वास ठेवत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

Check Also

नाना पटोले यांची टीका, मुस्लिमांशी नाते घट्ट म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींचे पुन्हा मुस्लीम द्वेषावरच भाषण

मोदी सरकारने कधीच कोणाला धर्म विचारला नाही व धर्माच्या नावावर योजनाही राबवल्या नाहीत. मुस्लीमांशी आपले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *