Breaking News

कायदा तोडणारा कोणीही असो राज्य सरकार कारवाई करेल राज्यात धार्मिक तेढ निर्माण होऊ नये याची राज्य सरकारने खबरदारी घ्यावी: नाना पटोले

महाराष्ट्र हे कायद्याचे राज्य आहे, कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. जर कोणी कायदा हातात घेत असेल तर त्यावर कायद्याप्रमाणे शासन व प्रशासन योग्य ती कारवाई करेल. राज्यातील वातावरण बिघडवण्याचा कोणताही प्रयत्न मविआ सरकार खपवून घेणार नाही. राज ठाकरे यांनी जर कायद्याचे उल्लंघन केले असेल तर पोलीस त्यांच्यावरही कारवाई करेल, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले.
यासंदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की,कोणाच्याही धर्माबद्दल थेट टीका करणे चुकीचे आहे. महाराष्ट्र हे पुरोगामी विचाराचे राज्य असून या विचाराचे रक्षण करण्याची राज्य सरकारची जबाबदारी आहे. सुप्रीम कोर्टाने लाऊडस्पिकरबाबत जे निर्देश दिले आहेत त्याचे पालन प्रशासन करेल. कायद्याच्या पुढे जाऊन कोणी भूमिका घेत असेल तर ती महाराष्ट्रात चालणार नाही. हा विषय राज ठाकरे या व्यक्तीपुरता मर्यादित नाही. कायदा तोडणारा कोणीही असो त्याच्यावर कायद्यानुसार कारवाई झाली पाहिजे. राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्याशी काँग्रेसने या विषयांवर चर्चा केली आहे. राज्यात धार्मिक तेढ निर्माण होऊ नये याबाबत सरकारने योग्य ती खबरदारी घ्यावी अशी सूचनाही केली.
भाजपा राज्यातील वातावरण गढूळ करण्याचा दोन वर्षापासून प्रयत्न करत आहे. यातून महाराष्ट्राची बदनामी होत असून त्याचा परिणाम गुंतणूक व रोजगार निर्मितीवर होत आहे. परिणामी तरुणांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण होत आहे हे सर्व थांबले पाहिजे. महाराष्ट्रात अशांतता निर्माण करण्याचे प्रयत्न काही लोक करत आहेत. बाहेरच्या राज्यातून तलवारी व इतर शस्त्र आणण्याचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेने उघड झाला. धार्मिक विवाद करण्याचा काही लोकांचा प्रयत्न आहे. परंतु प्रशासन सतर्क असून शासन व प्रशासन दोघेही राज्यात अशांतता पसरवण्याचा प्रयत्न हाणून पाडतील असेही ते म्हणाले.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भोंग्यावरून राज्यातील मस्जिदींना ४ तारखेपर्यंतचा अल्टीमेटम दिला होता. तसेच रमझान ईदच्या दिवशी मंदिरांमध्ये आरती करण्याचे आदेशही त्यांनी मनसैनिकांना दिले होते. मात्र तत्पूर्वीच काल २ मे रोजी कोणत्याही मंदिरांमध्ये आरती करू नका असे मनसैनिकांना आदेश देत आपणाला कोणत्याही धार्मिक सणाला गालबोट लावायचे नाही असे जाहीर केले. तर भोंग्याचा विषय हा सामाजिक असून धार्मिक नसल्याचा खुलासा त्यांनी केला होता.

Check Also

संभाजीनगरमध्ये शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना उबाठा गटाचे कार्यकर्त्ये एकमेकांसमोर

लोकसभा निवडणूकीच्या चवथ्या टप्प्यासाठी १३ मे ला मतदान होत आहे. महाराष्ट्रातील ११ लोकसभा मतदारसंघातही मतदान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *