Breaking News

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, पंजाच्या पकडीतील मशाल महाराष्ट्र स्वीकारणार नाही

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव व मशाल हे नवीन चिन्ह धारण करण्यास मान्यता दिल्यांनंतर भाजपाने यावर टीका करीत या घडामोडींना भाजपा जबाबदार नसल्याचे सांगतानाच पंजाच्या पकडीतील मशाल महाराष्ट्र स्वीकारणार नाही असा दावा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी केला.

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव व मशाल हे नवीन चिन्ह ठाकरे गटाला देतानाच शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नवीन नाव देण्यास मान्यता दिली आहे. शिवसेनेतील या घडामोडीवर भाष्य करताना पंजाच्या पकडीतील मशाल महाराष्ट्र स्वीकारणार नाही अशी टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदासाठी हिंदुत्वाचा विचार सोडून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार स्वीकारला. त्यांचे हिंदुत्व बेगडी असल्याचे लोकांनी पाहिले आहे. त्यांनी मशाल घेतली असली तरी ती पंजाने पकडली आहे. राज्यात पंजाची मशाल कोणी स्वीकारणार नाही आणि ही मशाल पेटणारही नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

भंडारा येथे बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, उद्धव ठाकरे शिवसेना केवळ काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आश्रयामुळे राजकीयदृष्ट्या जीवंत आहे. ज्या नेतृत्वाने हिंदुत्वाचा विचार सोडून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार स्वीकारला त्यांनी मशाल किंवा अन्य कोणतेही चिन्ह घेतले तरी त्यांना राजकीय लाभ होणार नाही. मुख्यमंत्रीपद मिळविण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार स्वीकारत आपल्या पक्षाचे व कार्यकर्त्यांचे प्रचंड नुकसान केले. शिवसेनेचा पक्ष का फुटला व त्या पक्षातून खासदार – आमदार का बाहेर पडले याचा उद्धव ठाकरे यांनी विचार करावा. त्यांचा पक्ष सांभाळण्याची जबाबदारी त्यांचीच आहे. त्या पक्षातील घडामोडींना भाजपा जबाबदार नाही, असे ते म्हणाले .

भारतीय जनता पार्टीची युती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांच्या शिवसेनेशी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या कामाच्या जोरावर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आमची युती आगामी सर्व निवडणुकांमध्ये विजय मिळवेल असा दावाही त्यांनी यावेळी बोलताना केला.

Check Also

नाना पटोले यांची टीका,… हा तर छत्रपती शिवरायांचा अपमान

हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षाकडून सातत्याने केला जात आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *