Breaking News

लघु उद्योजकांनी टाटा, अंबानी आणि किर्लोस्कर यांचा आदर्श घ्यावा उद्योग मंत्री सुभाष देसाई यांचे आवाहन

औरंगाबाद : प्रतिनिधी

दुर्दम्य इच्छाशक्ती आणि स्वत: वर विश्वास ठेवून उद्योग उभारणीसाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेत लघु उद्योजकांनी उद्योगक्षेत्रात भरारी घ्यावी असे आवाहन करत लघु उद्योजकांनी स्वर्गीय जमशेदजी टाटा, धीरूभाई अंबानी, लक्ष्मणराव किर्लोस्कर आदींचा आदर्श नजरेसमोर ठेवावा असे आवाहन उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी आज केले.
हॉटेल विंडसर कॅसल येथे राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती हबच्या १९ व्या राज्यस्तरीय बैठकीच्या उद्घाटनप्रसंगी देसाई बोलत होते. यावेळी सुक्ष्म व लघु मंत्रालयाचे संचालक पीजीएस राव, पी. उदयकुमार, आर. बी. गुप्ते, उद्योग संचालनालयाचे सह संचालक दिलीप गुरूलवार, राष्ट्रीय लघुउद्योग महामंडळाचे क्षेत्रीय प्रमुख पी. कृष्ण मोहन, बुद्धीष्ट इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरिंग ॲन्ड ट्रेडर्स असोसिएशनचे अध्यक्ष नंदकिशोर रत्नपारखे आदी उपस्थित होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षात राज्य सरकारने अनुसूचित जाती जमातीतील उद्योजकांना व्यवसायाकरिता प्रोत्साहित करण्यासाठी भरीव तरतूद केली आहे. त्यांच्या विकासाला प्राधान्य दिले आहे. भांडवली अनुदान, व्याजाचे अनुदान, विजेची सवलत, भूखंडांमध्ये राखीवता आदी योजना राबविण्यास सुरूवात केली आहे. विविध कार्यालयांना लागणाऱ्या वस्तू खरेदीसाठी लघुउद्योजकांच्या २४१ वस्तूंची देखील निवड केल्याचेही त्यांनी सांगितले.
राज्यात क्लस्टर विकासाला चालना देण्याचे काम राज्य सरकार कार्य करत आहे. यामध्ये औरंगाबादमध्ये पैठणी, उस्मानाबादमध्ये खवा आणि नांदेडमध्ये प्रिंटींगचे क्लस्टर उभारले आहे. उद्योगक्षेत्राला पुढे घेऊन जाण्यासाठी महाराष्ट्राने जीएसटीवर देशात पहिल्यांदा धोरण केले आहे. महिलांनीही  उद्योग क्षेत्रात पुढे यावे याकरिता स्वतंत्र महिला धोरण तयार केले आहे, ही भूषणावह अशीच बाब असल्याचे देसाई यांनी आवर्जून सांगितले.
शासनाने वेगवेगळी १२ औद्योगिक धोरणे तयार केली आहेत. तरूण, महिला यांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. महिलांना परदेशातील प्रदर्शनात भाग घेण्यासाठी प्रतिव्यक्ती ५० लाख तर उत्पादनाचा ब्रँड तयार करण्यासाठी १ कोटी रू. देण्याची भरीव तरतूद राज्याच्या धोरणांमध्ये करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Check Also

नाना पटोले यांची टीका,… हा तर छत्रपती शिवरायांचा अपमान

हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षाकडून सातत्याने केला जात आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *