Breaking News

महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री शिवसेनेचाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी

राज्यातल्या आगामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणुका शिवसेना स्वबळावरच लढेल आणि जिंकेल. या खेपेला विधानसभेवर भगवा फडकवावाच लागेल. पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल, असा निर्धार शिनवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी व्यक्त केला.

शिवसेनेचा ५२वा वर्धापनदिन आज गोरेगावच्या नेस्को सभागारात साजरा झाला. त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्यांनी पुन्हा केंद्रातील मोदी सरकार तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. सध्या मोदी यांच्या घरावर उडती तबकडी फिरत आहे. दोन-चार दिवसात कळेल की मोदी मंगळावर गेले. आता देशातही काही राहिले नाही, परदेशातही बघण्यासारखे काही उरले नाही. त्यामुळे चालले मंगळावर. चार वर्षे थापा मारून मारून सरकार चालले आहे, असे ते म्हणाले.

भारतीय जनता पार्टीने आज जम्मू-काश्मीर सरकारचा पाठिंबा काढला. हे सरकार नालायक आहे हे समजायला तुम्हाला तीन वर्षे लागली. सहाशे जवानांना शहीद व्हावे लागले. रमझानमध्ये केंद्र सरकारने शस्त्रसंधी पुकारली. तिथल्या राज्य सरकारने नाही. पाकिस्तान गणपती, नवरात्रीला शस्त्रसंधी जाहीर करतो का? देशाच्या संरक्षणमंत्री देशाच्या आहेत की भाजपाच्या, हेच समजत नाही. पक्षावर टीका झाली कीच या दिसतात, अशी टीकाही ठाकरे यांनी केली. बांगला देशच्या हिंदूंना येण्यासाठी परवानगी देणारे एक विधेयक केंद्र सरकार आणू पाहत आहे. असे विधेयक जर आणले गेले तर त्याला शिवसेना विरोध करेल, असे ते म्हणाले.

शरद पवार यांनी समविचारी पक्षांनी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. समविचारी म्हणजे कोण? केवळ  सत्ता हवी म्हणून समविचार आम्हाला मान्य नाही. शरद पवार यांना लोकमान्य टिळकांची पगडी चालत नाही. इतर टोप्या चालतात. राजकारण करताना स्वतःची डोकी वापरा. दुसऱ्यांच्या पगडीबद्दल बोलून मराठी माणसांत फूट पाडण्याचे काम करू नये, असेही त्यांनी सांगितले.

मुंबईचे महत्त्व कमी करून मुंबईला गुजरातचे उपनगर बनवण्याचा डाव आखला जात आहे. त्यामुळेच आम्ही मुंबई-बडोदा एक्स्प्रेस तसेच बुलेट ट्रेनला विरोध केला आहे. विकासाच्या आड आम्ही नाही. मात्र, मराठी माणसांच्या थडग्यांवर तुम्ही इमले बांधणार असाल तर ते आम्हाला मान्य नाही, असेही ठाकरे यांनी सांगितले.

Check Also

पंतप्रधान मोदींच्या मुंबईतील दौऱ्यात महिला काँग्रेस काळे झेंडे दाखवणार

भाजपाचा मित्र पक्ष जेडीएसचा लोकसभा उमेदवार प्रज्वल रेवन्ना याने शेकडो महिलांना ब्लॅकमेल करून त्यांच्यावर लैंगिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *