संसदेच्या विशेष अधिवेशना दरम्यान संसद कर्मचाऱ्यांच्या गणवेशावर भाजपाचे कमळ चिन्ह मुद्रीत केले जाणार आहे. या मुद्द्यावर काँग्रेसने मोदा सरकारवर टीका केली आहे. आता याच मुद्द्यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बनावट फुल लावून काही होणार नाही अशा शब्दात भाजपावर सडकून टीका केली.
संजय राऊत यांनी, मोदी सरकारने संसदेतील कर्मचाऱ्यांच्या गणवेशावर कमळाचं फूल लावले तरी काही होणार नाही. मात्र, जनता २०२४ च्या निवडणुकीत त्यांना पूर्ण चिखल लावणार आहे. हे बनावट कमळ लावून काहीही होणार नाही. लोक यांच्या तोंडावर चिखल लावणार आहेत, असे म्हणत भाजपावर सडकून टीका केली.
राज्यात सुरु असणाऱ्या मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणावर बोलताना संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले. या सरकारला मराठा आरक्षणावर काहीच करायचं नाही. हे सरकार घाबरट आहे. हे सरकार केवळ आश्वासन देतं असं म्हणत संजय राऊतांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर टीका केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंच्या लंडनमधील घर आणि संपत्तीबाबत गंभीर आरोप केले होते. त्याबाबत विचारलं असता संजय राऊत म्हणाले, मला याविषयी माहिती नाही, पण उद्धव ठाकरेंच्या लंडनमधील कथित घराच्या चाव्या अजय अश्रफ नावाच्या बिल्डरकडे असतील. अशाप्रकारे बोलल्याने त्यांच्यावरील ५० खोक्यांचे आरोप धुतले जाणार नाही हे त्यांनी लक्षात घ्यावं असे सांगत त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर नाव न घेता टीका केली.
या मुंबईसह ठाण्यात सध्या बिल्डरांचं राज्य सुरू आहे. हे सगळ्यांना माहिती आहे. यातून केलेली कमाई कोणत्या देशात जाते आणि कोणत्या बिल्डरच्या माध्यमातून जाते हेही सर्वांना माहिती आहे. आम्हाला बदनाम करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांचेवरील डाग धुतले जाणार नाहीत, असे संजय राऊत म्हणाले.