Breaking News

राज ठाकरेंचा दौरा रद्द झाल्यानंतर संजय राऊत म्हणाले, यातून शहाणपण आलं तर बरं मदत मागितली असती तर केली असती

अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची घोषणा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली. त्यानंतर उत्तर प्रदेशातून त्यांच्या दौऱ्याला विरोध सुरु झाला. तर महाराष्ट्रातून त्यांच्या अयोध्येच्या दौऱ्याबाबत शंका उपस्थित करण्यात आली. या पार्श्वभूमीवर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आपला नियोजित अयोध्या दौऱा स्थगित करत असल्याची घोषणा केली. मात्र त्यांच्या घोषणेनंतर शिवसेना प्रवक्ता संजय राऊत यांनी मनसेवर खोचक टीका करत भाजपावर निशाणारा साधला.
भाजपाने त्यांच्या बाबतीत असं का करावं. हे चुकीचं आहे. प्रत्येक वेळी भाजपा असा खेळ करतं आणि महाराष्ट्रातल्या नेत्यांना त्यांच्या राजकीय फायद्यासाठी वापरून घेतं. त्यातलाच हा प्रकार मला दिसतोय. यातून एक शहाणपण काही लोकांना आलं, तर बरं होईल. यात नुकसान महाराष्ट्राच्या नेतृत्वाचं, महाराष्ट्राचं होतं. आपण भाजपाच्या हातात वापरले जातोय हे काही लोकांना उशीरा समजतं. आम्ही हा विषय मर्यादित ठेवलाय. हे राजकारण आम्हाला करायचं नसल्याचे सांगत शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे नाव न घेता टीका केली.
आम्हाला विचारलं असतं, तर राज ठाकरेंना मदत केली असती असे सांगत ते पुढे म्हणाले की, आदित्य ठाकरे १५ जूनला अयोध्येला जाणार आहेत. इतर पक्षाचे काही कार्यक्रम तिथे होते. त्यांनी ते रद्द केले. पण ५ जूनच्या कार्यक्रमासाठी त्यांना काही सहकार्य हवं असतं, तर ते आम्ही नक्कीच दिलं असतं. अयोध्या, उत्तर प्रदेशात शिवसेनेला मानणारा फार मोठा वर्ग आहे. अयोध्येच्या जनतेने, साधूसंतांनी, तिथल्या राजकारण्यांनी नक्कीच मदत केली असती.
गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा आज स्थगित झाल्यानंतर त्यावरून आता प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. उत्तर प्रदेशातील भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागितल्याशिवाय अयोध्येत पाऊल ठेऊ देणार नाही, असं जाहीर केलं होतं. या पार्श्वभूमीवर हा दौरा स्थगित झाल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यावरून राज ठाकरेंना खोचक शब्दांत नाव न घेता टोला लगावला आहे. तसेच, महाराष्ट्रातील नेत्यांचा आपल्या फायद्यासाठी भाजपा नेहमीच वापर करून घेत आली असल्याची टीका देखील संजय राऊत यांनी यावेळी केली.
काहींना तीर्थयात्रेला जायचं असतं, तेव्हा ते विचारतात काही मदत करू शकता का? शिवसेनेचा एक मदत कक्ष आहे. कुणाला दर्शनाला अडचणी येत असतील, तर आम्ही मदत करतो. तिथे आम्ही राजकारण बाजूला ठेवतो असा खोचक टोलाही त्यांनी लागवाला.
गेल्या काही दिवसांपासून तिथलं वातावरण खराब होतं. बृजभूषण सिंह यांनी काही प्रश्न उपस्थित केले होते. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचा कार्यक्रम होत नाही. कदाचित लोकांच्या मनात रोष असावा. पण आदित्य ठाकरे १५ जूनला अयोध्येला जात आहेत. हा धार्मिक कार्यक्रम असून शक्तिप्रदर्शन वगैरे काही नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
शिवसेनाप्रमुखांची भूमिका आहे की राज्यसभेची सहावी जागा शिवसेना लढवेल. संभाजीराजे भोसले शिवसेनेचे उमेदवार होणार असतील, तर त्या बाबतीत नक्कीच विचार केला जाईल. छत्रपती संभाजीराजे सगळ्यांनाच प्रिय आहेत. आमची भूमिका आहे की दुसऱ्या जागेवर देखील शिवसेनेचाच उमेदवार निवडून यावा असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Check Also

मल्लिकार्जून खर्गे यांची टीका, पंतप्रधान मोदींच्या तोंडी उठसूट मुघल, मुस्लीम व मंगळसूत्राचीच…

काँग्रेस पक्ष देशासाठी लढला, अनेकजण फासावर गेले, पण महात्मा गांधी यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून लढले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *